तीन वर्षात भालेर एमआयडीसी पूर्णपणे होणार कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:33 IST2021-08-27T04:33:32+5:302021-08-27T04:33:32+5:30
नंदुरबार : जिल्ह्याचा औद्योगिक उद्योगधंदे वाढून रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने भालेर, ता. नंदुरबार येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास ...

तीन वर्षात भालेर एमआयडीसी पूर्णपणे होणार कार्यान्वित
नंदुरबार : जिल्ह्याचा औद्योगिक उद्योगधंदे वाढून रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने भालेर, ता. नंदुरबार येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उद्योग धंद्यांसाठी प्लाॅट वितरण सुरू केले आहे. यांतर्गत आतापर्यंत सुमारे ६० प्लाॅटचे वाटप झाले असून, ३५० प्लाॅट वाटपाची प्रक्रिया येत्या काळातही सुरू राहणार आहे.
नंदुरबार शहराच्या पूर्वेला १५ किलोमीटरवर भालेर शिवारात औद्योगिक विकास क्षेत्राला २०१३ साली मंजुरी देण्यात आली होती. परंतू प्रत्यक्षात २०१९ पासून सुरू झाले. याठिकाणी रस्ते, पाणीपुरवठा यंत्रणा तसेच इतर साधने औद्योगिक विकास महामंडळाने पूर्ण केल्यानंतर प्लाॅट वाटपाला सुरुवात झाली होती. कोरोनामुळे २०२० या वर्षात कामकाज पूर्णपणे रखडले होते. दरम्यान २०२१ मध्ये मात्र कामाला गती आली होती. यांतर्गत जून महिन्याच्या अखेरपर्यंत १८ प्लाॅट वितरीत करण्यात आले होते. ऑगस्ट अखेरी ही संख्या ६० वर गेली आहे. याठिकाणी टेक्सटाईल मिल, फूड पॅकेजिंग, फॅब्रिकेशन, जिनिंग, मिरची प्रक्रिया यांसह विविध उद्योगधंद्यांची सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भालेर एमआयडीसीठी एकूण २२५ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. यातील ४०५ प्लाॅटपैकी ५३ प्लाॅट हे टेक्सटाईल पार्कसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. परंतु याला अद्यापही याेग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे.
आजअखेरीस याठिकाणी एकही उद्योग सुरू नसल्याची माहिती देण्यात आली आहे. येत्या काळात प्लाॅट वाटप पूर्ण केल्यानंतर उद्योग येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नंदुरबार तालुक्यातील अत्यंत महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प आहे. परंतु त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. उद्योजकांना आमंत्रित करण्याबाबत उदासीनता आहे. स्थानिक उद्योजकांना याठिकाणी संधी दिल्यास एमआयडीसीचे कामकाज सुरू होऊ शकते.
आर्थिक मंदीचा परिणाम
२०१३ पासून मंजूर एमआयडीसीत गेल्या दोन वर्षांपासून प्लाॅट वितरण सुरू करण्यात आले आहे. परंतु लाॅकडाऊनमुळे उद्योगधंद्यांना मोठा फटका बसला होता. गतवर्षात कोरोनाचे आगमन झाल्यानंतर कामकाज ठप्प झाले होते. परंतु आजअखेरीस एमआयडीसीत प्लाॅट वितरण सुुरू झाले असल्याची माहिती दिली जात आहे.
ग्रामीण भागात असलेली ही एमआयडीसी मुख्य रस्त्यापासून लांब आहे. यातून बरड जमिनीवर प्लाॅट केले गेले आहेत. बहुतांश व्यावसायिक वाहतुकीचा खर्च वाढणार असल्याचे दिसून आल्यानंतर नकार देत असल्याचे सांगण्यात आले आहे.