भालेर एमआयडीसी नावालाच; वर्षभरात फक्त १८ प्लाॅटचे झाले वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:21 IST2021-06-11T04:21:21+5:302021-06-11T04:21:21+5:30
नंदुरबार : आदिवासी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या नंदुरबारमध्ये उद्योगधंदे वाढून रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने भालेर, ता. नंदुरबार येथे ...

भालेर एमआयडीसी नावालाच; वर्षभरात फक्त १८ प्लाॅटचे झाले वाटप
नंदुरबार : आदिवासी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या नंदुरबारमध्ये उद्योगधंदे वाढून रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने भालेर, ता. नंदुरबार येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उद्योग धंद्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. परंतु गेल्या एक वर्षात याठिकाणी केवळ १८ प्लाॅटचे वाटप झाले असून, ३९० प्लाॅट पडून आहेत.
टेक्सटाईल मिल, फूड पॅकेजिंग, फॅब्रिकेशन, जिनिंग, मिरची प्रक्रिया यांसह विविध उद्योगधंद्यांना सोयीचे होईल, यासाठी नंदुरबार शहराच्या पूर्वेला १५ किलोमीटर अंतरात भालेर एमआयडीसी मंजूर करण्यात आली आहे. २०१३पासून मंजुरी मिळालेल्या या औद्योगिक वसाहतीचे २०१९ पासून वेगात सुरू आहे. याठिकाणी रस्ते, पाणी पुरवठा यंत्रणा तसेच इतर साधने औद्योगिक विकास महामंडळाने पूर्णही केले आहेत. परंतु अद्याप एकही उद्योग आलेला नाही. कोराेनामुळे प्लाॅट वाटपाचे कामकाज गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते. यातून राेजगार निर्मिती न झाल्याने भालेर व परिसरातील कुशल व अकुशल युवा कामगारांचा भ्रमनिरास झाला आहे.
आर्थिक मंदीचा परिणाम
२०१३पासून मंजूर एमआयडीसीत गेल्या दोन वर्षांपासून प्लाॅट वितरण सुरू करण्यात आले आहे. परंतु लाॅकडाऊनमुळे उद्योगधंद्यांना मोठा फटका बसला असल्याने येथील उद्योग प्लाॅटचे वाटप रखडले असल्याची माहिती देण्यात येत आहे.
ग्रामीण भागात असलेली ही एमआयडीसी मुख्य रस्त्यापासून लांब आहे. यातून बरड जमिनीवर प्लाॅट केले गेले आहेत. बहुतांश व्यावसायिक वाहतुकीचा खर्च वाढणार असल्याचे दिसून आल्यानंतर नकार देत आहेत.
एकही उद्योग सुरू नाही
आजअखेरीस याठिकाणी एकही उद्योग सुरू नसल्याची माहिती देण्यात आली आहे. केवळ १८ प्लाॅट वाटप झाले असून, येत्या काळात प्लाॅट वाटप पूर्ण केल्यानंतर उद्योग येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नंदुरबार तालुक्यातील अत्यंत महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प आहे. परंतु त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. उद्योजकांना आमंत्रित करण्याबाबत उदासिनता आहे. स्थानिक उद्योजकांना याठिकाणी संधी दिल्यास एमआयडीसीचे कामकाज सुरू होऊ शकते.
टेक्सटाईल पार्क
भालेर एमआयडीसीतील ४०५ प्लाॅटपैकी ५३ प्लाॅट हे टेक्सटाईल पार्कसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. परंतु यातील किती वाटप झाले, याची माहिती मात्र नाही. धुळे येथून या एमआयडीसीचे कामकाज केले जात आहे.
आयटीआय झाल्यानंतर अनेक ठिकाणी काम केले. परंतु लाॅकडाऊनमुळे गावाकडे आहे. येथे एमआयडीसी सुरू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. परंतु या एमआयडीसीत उद्योग सुरू नाहीत.
- योगेश पाटील, भालेर, ता. नंदुरबार.
भालेर, काकर्दे व शिंदगव्हाण परिसरात युवकांची संख्या मोठी आहे. येथील युवकांना रोजगार या एमआयडीसीतून मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु रोजगार मिळालेला नाही.
-राकेश माळी, काकर्दे, ता. नंदुरबार.
भालेर एमआयडीसी ही केवळ नंदुरबारच नव्हे, तर तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. येथील उद्योग वाढीस लागल्यास अनेक समस्या दूर होणार आहेत. परंतु त्याकडे शासन लक्ष देत नाही.
-समाधान पाटील, नंदुरबार.