प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत ३३ हजार महिलांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:05 IST2021-09-02T05:05:58+5:302021-09-02T05:05:58+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत आतापर्यंत ३३ हजार ६२० पात्र महिलांना लाभ देण्यात आला असून, १३ कोटी ...

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत ३३ हजार महिलांना लाभ
नंदुरबार : जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत आतापर्यंत ३३ हजार ६२० पात्र महिलांना लाभ देण्यात आला असून, १३ कोटी ४२ लाख इतके अनुदान डीबीटी पद्धतीने थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरीत करण्यात आले आहे.
नवीन लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठी १ ते ७ सप्टेंबर २०२१ दरम्यान मातृ वंदना सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजुरीसाठी काम करावे लागल्यास अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांच्या व नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती माता व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य चांगले रहावे यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने १ जानेवारी
२०१७ पासून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात सुरू केली आहे.
या योजनेतंर्गत १ जानेवारी २०१७ रोजी किंवा त्यानंतर पहिल्यांदा ज्या मातांची प्रसूती झाली आहे किंवा गर्भधारणा झाली असेल अशा पात्र महिलांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत तीन टप्प्यांमध्ये पाच हजार रुपयांचा लाभ पहिल्या जीवित अपत्यासाठी देण्यात येतो. पहिला टप्पा एक हजार रूपये असून, मासिक
पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसांत गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर देण्यात येतो. यासाठी गर्भधारणा नोंदणी शासकीय आरोग्यसंस्थेत करणे आवश्यक असते. दुसरा टप्पा दोन हजार रुपये असून, गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर प्रसूतीपूर्व तपासणी केल्यास देण्यात येतो. तिसरा टप्पा दोन हजार रुपये प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्म नोंदणी व बालकास बीसीजीपासून बाळाचे प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यानंतर देण्यात येतो.
अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ देण्यासाठी मातृ वंदना सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असून, या सप्ताहात नवीन लाभार्थी नोंदणी, आधार शिबिर, बँक खाते शिबिर घेण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी नंदुरबार यांनी केले आहे.