‘भीक माग, पण प्रामाणिक वाग..’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:21 IST2021-07-21T04:21:20+5:302021-07-21T04:21:20+5:30
‘भीक माग, पण प्रामाणिक वाग..’ या उक्तीप्रमाणे नंदुरबारातील एक वयोवृद्ध भिकारी अवघी एक रुपया भीक घेऊन समाधान मानतो. एक ...

‘भीक माग, पण प्रामाणिक वाग..’
‘भीक माग, पण प्रामाणिक वाग..’ या उक्तीप्रमाणे नंदुरबारातील एक वयोवृद्ध भिकारी अवघी एक रुपया भीक घेऊन समाधान मानतो. एक रुपयापेक्षा अधिक दिले तर तो नम्रपणे नकार देतो. कुणी पाच रुपये दिले तर त्याला चार रुपये परतदेखील देतो. आजच्या या जमान्यात या भिकारीकडून प्रामाणिकपणाचा कित्ता गिरवावा असेच हे उदाहरण आहे. मोठ्या तीर्थस्थानावरील, मोठ्या शहरांमधील भिकारी लखोपती असल्याची उदाहरणे अनेक वेळा समोर आले आहे. भीक घेताना मोठ्या रकमेची भीक घ्यावी यासाठीदेखील अनेक जण आग्रही असतात. परंतु नंदुरबारातील एक प्रामाणिक भिकारी केवळ एक रुपया भीक घेतो. अंगात मळकट कपडे, दाढी वाढलेली, हातात एक मळकट पिशवी आणि मुखात हरिनामाचा गजर, शिवाय विविध पारंपरिक धार्मिक गिते म्हणत तो भीक घेतो. भिकारी आला म्हणून कुणी पाच रुपये, कुणी दहा रुपये देतो, परंतु तो नम्रपणे नकार देतो. केवळ एक रुपया एवढेच तो इशाऱ्याने सांगतो. कुणी जेवण तर कुणी त्याला कपडे देण्याचा प्रयत्न करतो. परंतु तेदेखील तो घेत नाही. अनेक जणांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो कुणाशीही बोलत नाही. प्रामाणिक आणि हट्टी स्वभाव त्याचा त्यातून दिसून येतो. आजकालच्या या स्वार्थी जमान्यात हा भिकारी एक वेगळाच संदेश देऊन जातो.
- मनोज शेलार, नंदुरबार