खुल्या जागेवरील बाेअर धोकादायक ठरू पाहत आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST2021-06-27T04:20:28+5:302021-06-27T04:20:28+5:30
तळोदा : शहरातील प्रतापनगर या नवीन वसाहतीत केलेला बोअर पावसाच्या पाण्यामुळे अक्षरश: खचला असून, तेथे मोठा खड्डा पडला आहे. ...

खुल्या जागेवरील बाेअर धोकादायक ठरू पाहत आहे
तळोदा : शहरातील प्रतापनगर या नवीन वसाहतीत केलेला बोअर पावसाच्या पाण्यामुळे अक्षरश: खचला असून, तेथे मोठा खड्डा पडला आहे. विशेषत: हा बोअर खुल्या जागेवर मारण्यात आला आहे. वसाहतीतील लहान मुले जिम करतात. साहजिकच रहिवाशांसाठी तो धोकादायक ठरला आहे. याबाबत पालिकेने चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी वसाहतधारकांनी केली आहे.
शहरातील शहादा रस्त्यावरील पालिका हद्दीत प्रतापनगर ही वसाहत स्थापन झाली आहे. येथे साधारण १०० पेक्षा अधिक कुटुंबे गेल्या १० ते १५ वर्षांपासून राहत आहेत. ही वसाहत सध्या पालिका हद्दीत येते. असे असले तरी वसाहत नागरी सुविधांपासून कोसो दूर आहे. नागरी सुविधासाठी रहिवाशांनी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडे सतत पाठपुरावा केला तेव्हा कुठे तरी पिण्याचा पाण्यासाठी वसाहतीमधील ओपन स्पेस्वर सहा महिन्यांपूर्वी कूपनलिका करून देण्यात आली आहे. तथापि संबंधित ठेकेदाराने बोअर केल्यानंतर त्यामध्ये टोळ न टाकल्याने नुकत्याच पडलेल्या पावसाच्या पाण्यामुळे तोआजूबाजूला खचत आहे. त्यामुळे प्रचंड मोठा खड्डादेखील पडला आहे. बोरच्या क्रेशिंग पाईपमध्ये माती साचत असल्याने रुतलेल्या गाळाने कूपनलिकाच निकामी होण्याची शक्यता आहे. साहजिकच शासनाचा यावर झालेला खर्च वाया जाण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. याबाबत पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना रहिवाशांनी अनेकदा सांगितले आहे. तरीही त्याकडे गांभीर्याने लक्ष घातले जात नसल्याचा आरोप आहे. वास्तविक वसाहतीत जेथे हा बोअर केला आहे तेथे ओपन स्पेस आहे. शिवाय पालिकेने रहिवाशांसाठी ओपन जिमदेखील बसवली आहे. व्यायाम करण्यासाठी सकाळ, संध्याकाळी रहिवाशी मोठ्या प्रमाणात जिमला येत असतात. लहान बालकेही येतात. अशावेळी या जिमपासून जवळच असलेल्या बोअरमध्ये पाय घसरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे वसाहतधारकांना हा बोअर धोकादायक बनला आहे. संबंधित यंत्रणांनी या प्रकरणी चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी, अशी रहिवाशांची मागणी आहे.
पालिकेने जलवाहिन्याही टाकल्या
प्रतापनगरवासीयांसाठी सहा महिन्यांपूर्वी केलेल्या या कूपनलिका वरून पालिकेने रहिवाशांच्या घरापर्यंत जलवाहिन्याही टाकल्या आहेत. मात्र कनेक्शनअभावी त्या तशाच पडल्या आहेत. जोडण्यासाठी पालिकेने स्वतः पुढाकार घेण्याची आवश्यकता असताना त्यांनी ही जबाबदारी वसाहतधारकांवर सोपवून मोकळे झाले आहे. त्यामुळे जोडण्यांबाबत रहिवाशीदेखील संभ्रमात आहेत. तशी चर्चादेखील आहे. याशिवाय जोडण्यांसाठी पालिकेने एका ग्राहकांकडून तब्बल दोन हजार रुपये डिपाॅझिट आकारली आहे. सदर रक्कम टप्प्याटप्प्याने आकारली तर रहिवाशी भरण्यास पुढे येतील. मात्र तसे होत नसल्यामुळे कनेक्शनदेखील रखडले आहे. पालिका पदाधिकारी व प्रशासनाने याबाबत ठोस मार्ग काढावा, अशी मागणी आहे.