मूलभूत साक्षरता व संख्या ज्ञान कार्यक्रम ऑनलाईन उद्बोधन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:31 IST2021-04-02T04:31:54+5:302021-04-02T04:31:54+5:30
मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान या विषयावर दोनदिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी डायटचे प्राचार्य डॉ. जे. ओ. भटकर ...

मूलभूत साक्षरता व संख्या ज्ञान कार्यक्रम ऑनलाईन उद्बोधन कार्यशाळा
मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान या विषयावर दोनदिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी डायटचे प्राचार्य डॉ. जे. ओ. भटकर यांनी कार्यक्रमाची गरज व उद्दिष्टे सांगून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या शिकण्यातील उणीवा मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान कार्यक्रमाच्या माध्यमातून भरून काढता येतील. आकांक्षित जिल्ह्याच्या गरज व उद्दिष्टांचा विचार करून यासाठीचा घटकसंच तयार करण्यात आला असल्याची माहिती दिली.
माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी कार्यक्रमाचे महत्त्व सांगून मुलाच्या मूलभूत क्षमतेच्या विकासासाठी हा उपक्रम पूरक ठरेल असे सांगितले. प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वनमाला पवार यांनी हा उपक्रम विदयार्थ्यांच्या किमान मूलभूत क्षमतांवर आधारित तयार करण्यात आला असल्याचे सांगितले. मुलांच्या शंभर टक्के मूलभूत क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षकांना तो मदतीचा होईल. हा उपक्रम ऑनलाईन व कोरोना नियमांचे पालन करून सर्वांनी मिळून यशस्वी करुया, असे आवाहनही त्यांनी केले.
या उद्बोधन कार्यशाळेस जिल्ह्यातील विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, पहिली ते आठवीचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता प्रवीण चव्हाण, रमेश चौधरी, अधिव्याख्याता बी. आर. पाटील, डॉ. संदीप मुळे, पंढरीनाथ जाधव तसेच सर्व विषय सहायक व भाषा- गणित विषयाचे जिल्हा संसाधन गट सदस्य यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेस जिल्ह्यातील पंधराशे शिक्षक ऑनलाईन उपस्थित होते.
तत्पूर्वी या उपक्रमासाठी घटकसंच विकसन कार्यशाळेचे डाएट संकुलात आयोजन करण्यात आले होते. पी. जी. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे चेअरमन रुद्रप्रताप रघुवंशी यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. गणित व भाषा विषयांच्या जिल्हा साधन गटातील सदस्यांचा त्या कार्यशाळेत सहभाग होता.