तिरंगी मास्क वापरण्यास बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:33 IST2021-01-19T04:33:33+5:302021-01-19T04:33:33+5:30
हिंदू जनजागृती समितीतर्फे नंदुरबारचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाचा ...

तिरंगी मास्क वापरण्यास बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीची मागणी
हिंदू जनजागृती समितीतर्फे नंदुरबारचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच राज्य शासनाच्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयानुसार कार्यवाही करावी. राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता आहे. १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दिवशी अनेकजण राष्ट्रध्वज विकत घेऊन मोठ्या अभिमानाने मिरवतात. मात्र हेच कागदी/प्लॅस्टिकचे छोटे-छोटे राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, कचऱ्यात, गटारात आदी ठिकाणी पडलेले आढळतात. अनेक दिवस या राष्ट्रध्वजांची विटंबना पाहावी लागते. राष्ट्रध्वजाची अशी विटंबना रोखण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले आणि त्यानुसार केंद्रीय व राज्य गृह विभाग, शिक्षण विभाग यांनी याविषयीचे परिपत्रक काढले. महाराष्ट्र शासनानेही राज्यात ‘प्लॅस्टिक बंदी’चा निर्णय घेतला. त्यानुसार प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे हे कायदाबाह्य ठरते. मात्र असे असूनही विक्री केली जाते. म्हणून शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी प्रबोधन करणारी कृती समिती स्थापन करावी. त्यामध्ये हिंदू जनजागृती समितीचाही समावेश करावा, जिल्ह्यात कुठेही प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचे उत्पादन आणि त्याच्या विक्रीला प्रतिबंध घालावा या विषयावर व्याख्यान व प्रश्नमंजूषा घेण्यास अनुमती द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना हिंदू जनजागृती समितीचे प्रा. डॉ. सतीश बागुल, राहुल मराठे, उद्योजक शंकर बालानी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे नरेंद्र तांबोळी, गौरव धामणे, योगेश जोशी उपस्थित हाेते.