बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या वस्तुंना दुर्गम भागात अद्याप स्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:39 IST2021-02-25T04:39:15+5:302021-02-25T04:39:15+5:30
कणगीचा, मोठी, बुळवीचा उपयोग या भागातील शेतकरी बांधव पूर्वीपासून पारंपरिक मोर, बंटी, पादी, ज्वारी, मोठी मोर, लहान मोर, मोठी ...

बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या वस्तुंना दुर्गम भागात अद्याप स्थान
कणगीचा, मोठी, बुळवीचा उपयोग या भागातील शेतकरी बांधव पूर्वीपासून पारंपरिक मोर, बंटी, पादी, ज्वारी, मोठी मोर, लहान मोर, मोठी भादी, नागनी, साळ, तुवर, असे विविध धान्य साठवून ठेवण्यासाठी करत असत. यामध्ये १५ ते २० वर्षांपर्यंतदेेखील धान्य साठवून ठेवू शकत असल्याने आजही काही ठिकाणी घराच्या माळ्यावर जुन्या कणग्या जपून ठेवलेल्या दिसून येतात.
आदिवासीबहुल भागात जंगलतोड झाली असली, तरी आता या भागातील लोकांनी जंगलाचे महत्व जाणून त्यांनी आपल्या शेताच्या बांधावर व रिकाम्या जागेवर मोठ्या प्रमाणावर झाडे व बांबू लागवड केल्याने या बांबूचा उपयोग आता त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनविण्यासाठी होत आहे. त्यात प्रामुख्याने बाबूपासून तयार करण्यात येणाऱ्या वस्तू गाव पाड्यांवर घराघरात वापरल्या जातात. स्वयंपाक खोलीत स्थान मिळविलेले बांबूचे सुपड, टोपली, टोपल, बोखी टोपली तसेच चारा साठवण्यासाठी किवड्या, टपालो मोरबंटी रचून नेण्यासाठी, किन्जो चटई, दरवाजा, घराच्या आजुबाजुला भिंती म्हणून लावण्यात येणारे कुड यांचा आजही वापर केला जात आहे. कणगी व्यवसायही उदयास येत आहे. शेतकरी प्रामुख्याने कणगी, टोपल्या, झाडू, घरासाठी, शेतीसाठी लागणारी विविध औजारेही बांबूपासून बनवतात.
बांबूच्या कोऱ्या टोपलीला याहा मोगी मातेच्या पूजेत मानाचे स्थान
आदिवासी समाजाचे कुलदैवत असलेल्या याहा मोगी मातेच्या दर्शनासाठी नवस फेडण्यासाठी जाणारे भाविक या बांबूच्या कोऱ्या टोपलीत पूजेचे लागणारे साहित्य ठेवून ही टोपली डोक्यावर घेतात व मानाचे स्थान आजही देत असतात.