शिक्षकाने तयार केलेल्या गीतांमधून कोरोना लसीकरणासाठी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:21 IST2021-06-11T04:21:12+5:302021-06-11T04:21:12+5:30
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. परंतु आदिवासी बांधवांमध्ये लसीकरणाबाबत अनेक गैरसमज व अफवा पसरल्यामुळे लस ...

शिक्षकाने तयार केलेल्या गीतांमधून कोरोना लसीकरणासाठी जनजागृती
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. परंतु आदिवासी बांधवांमध्ये लसीकरणाबाबत अनेक गैरसमज व अफवा पसरल्यामुळे लस घेण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. यातून लसीकरणाची टक्केवारी खूपच कमी होती. परिणामी जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारुड, शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी यांनी जनजागृतीसाठी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत तालुक्यातील आष्टे केंद्रातील मुख्याध्यापक संतोष नांद्रे, खासगी शाळेचे शिक्षक विनायक वळवी. हरीपूर जिल्हा परिषद शाळेचे मनोहर शिंदे, टाकलीपाडा जिल्हा परिषद शाळेचे दिलीप चव्हाण, पिंप्रीपाडा येथील ग्रामसेवक लिलेश्वर खैरनार व प्रा.डॉ.श्री. माधव कदम यांनी कलापथक तयार केले आहे.
पथकाने मुख्याध्यापक संतोष नांद्रे यांनी लिहिलेल्या आदिवासी, अहिराणी, मराठी भाषेतील गीतांद्वारे भिलाईपाडा, पिंप्रीपाडा, झराळी, टाकलीपाडा नांदर्खे, सुतारे, केवडीपाडा, ठाणेपाडा, गंगापूर, अजेपूर, घोगळगाव, अंबापूर, नागसर, शिवपूर या गावांमध्ये लसीकरण शिबिराच्या पहिल्या दिवशी जाऊन जनजागृती केली. स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, प्राथमिक, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा यांच्यासह गावात फेरी काढून प्रत्येक चौकात आदिवासी,अहिराणी भाषेत कलापथक व गीतांचे सादरीकरण करून लोकांच्या मनातील गैरसमज दूर करत आहेत. त्यांच्या ‘ भाऊ तुमू उनावी ल्या, दादा तुमू उनावी ल्या’ या गीतावर अनेक लोक ठेका धरत असून लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. गावागावात लसीकरणाची टक्केवारी वाढली असून काही गावे १०० टक्के होण्याच्या मार्गावर आहेत. या कार्यासाठी लागणारे संगीत साहित्य, बॅनर आदी सर्व साहित्य शिक्षकच आणत असून यासाठी त्यांनी खर्चही केला आहे. कलापथकातील शिक्षकांना आरोग्य विभागाचे डॉ. संदीप काकुस्ते, शिक्षण विस्तार अधिकारी एस.एन. पाटील, केंद्रप्रमुख डी.जे. राजपूत यांचे मार्गदर्शन लाभत आहे.