जुलैतही सरासरी एवढाच पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 12:00 IST2020-07-12T12:00:15+5:302020-07-12T12:00:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात जून महिन्यात सहा दिवस कोसळलेल्या पावसामुळे जुलै महिन्यातील पावसाबाबत तर्कविर्तक लावले जात आहेत़ ...

जुलैतही सरासरी एवढाच पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात जून महिन्यात सहा दिवस कोसळलेल्या पावसामुळे जुलै महिन्यातील पावसाबाबत तर्कविर्तक लावले जात आहेत़ या तर्कांना येत्य चार दिवसात पूर्णविराम मिळण्याची शक्यता असून अरबी समुद्रात बाष्पयुक्त वाऱ्यांची निर्मिती वेगाने होत असल्याने जिल्ह्यात चार दिवसात समाधानकारक पाऊस येण्याची शक्यता आहे़
जून महिन्यात केवळ ७४ मिलीमीटर पावसाने हजेरी लावली आहे़ हा पाऊस पेरणी योग्य असल्याने शेतशिवारात ७० टक्के क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ जूनमध्ये पावसाचे दिवस कमी असल्याने जुलै मधील पावसावर शेतकऱ्यांची भिस्त आहे़ यात आतापर्यंत ११ दिवसही कोरडे गेले असल्याने शेतकºयांच्या चिंता वाढल्या आहेत़ परंतु ही चिंता दूर होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने दर्शवली आहे़ जून महिन्यात धडकणारा मॉन्सून हिमालयाकडे गेला असल्याने वातावरणीय बदलांना सुरूवात झाली आहे़ यातच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात एकाच वेळी बाष्पयुक्त वाºयांच्या निर्मितीचा वेग वाढत असल्याचे हवामान खात्याच्या निदर्शनास आले आहे़ हे वारे १४ ते १७ जुलै पर्यंत राज्यात धडकणार आहेत़ यातून नंदुरबार जिल्ह्यात १७ जुलैपासून पाऊस होण्याची शक्यता आहे़ हा पाऊस किमान ३१ जुलैपर्यंत राहणार असल्याने महिनाअखेरपर्यंत सरासरी १०८ मिलीमीटर पाऊस होण्याची शक्यता आहे़
दरम्यान १ ते ११ जुलै दरम्यान आतापर्यंत ३३ मिलीमीटर तर जून महिन्यात जिल्ह्यात सरासरीच्या १५५ पैकी ७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे़ पावसाची नोंद झाली असली तरीही १ जून ते ११ जुलै या काळात कोरड्या दिवसांची संख्याही अधिक आहे़ तब्बल ४१ दिवसांच्या या काळात जून महिन्यातील १० तर गेल्या १० दिवसातील दोन दिवस पाऊस झाला आहे़
येत्या ३१ जुलैपर्यंत पाऊस येणार असल्याने कोरडे दिवस कमी होणार आहेत़ यातून पीक संगोपनासाठी शेतकºयांना जमिनीत ओल मिळणार असून पीकांचे होणारे नुकसान आणि दुबारपेरणीचे संकट टळेल अशी अपेक्षा हवामान तज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे़
जून २०१९ ते जुलै २०१९ या ६१ दिवसांच्या कालावधीत ३२ दिवस कोरडे गेले होते़ १ ते ११ जून दरम्यान ११ दिवस, १४ त २३ जून दरम्यान १० दिवस तर ९ ते १८ जुलै दरम्यान ११ दिवस पाऊस नव्हता़ तालुकानिहाय सरासरी पाहिल्यास गेल्या वर्षाची स्थिती यंदाच्या जून महिन्यासारखीच असल्याचे स्पष्ट होत आहे़
जिल्ह्यात २०१९ मध्ये जुलै ते आॅक्टोबर या काळात धो-धो पाऊस बरसला होता़ यात अतीवृष्टीसारखी गंभीर स्थिती अनुभवण्यास आली होती़ मात्र जून २०१९ मध्ये केवळ ४९़२ मिलीमीटर पाऊस झाला़ सहा दिवस पाऊस तर २५ दिवस हे कोरडे होते़ हीच गत जून २०२० मध्ये आहे़ १ ते ३० जून दरम्यान ७४ मिलीमीटर पाऊस झाला असून हा पाऊस केवळ १० दिवस झाला आहे़ गेल्या वर्षात जुलै महिन्यात १५ दिवस जिल्ह्याच्या विविध भागात २८७ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती़
नंदुरबार तालुक्यात जून महिन्यात सरासरी १५३ मिलीमीटर पाऊस कोसळतो़ ३० जूनपर्यंत तालुक्यात ७४ मिलीमीटर पाऊस झाला आहे़ नवापूर तालुक्यात १ ते ३० जूनदरम्यान ५८, शहादा १०८, तळोदा ८६, धडगाव ५७ तर अक्कलकुवा तालुक्यात ५६ मिलीमीटर पाऊस कोसळला आहे़ जिल्ह्यातील सर्व ३६ मंडळात कृषी विभाग आणि हवामान खात्याने लावलेल्या पर्जन्यमापकात या पावसाची नोंद करण्यात आली आहे़ मंडळनिहाय आढावा घेतल्यास प्रत्येक मंडळात ६ ते ११ दिवस पाऊस झाला आहे़ तळोदा मंडळात १२ दिवस तर तोरणमाळ मंडळात जून महिन्यात ११ दिवस पाऊस कोसळला आहे़ शहादा तालुक्यात १० मंडळात ६ ते ७ दिवस पावसाच्या नोंदी आहेत़