तळोद्यातील कार्यकर्त्याकडून ६० रेमडीसीव्हीरची उपलब्धता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:31 IST2021-04-07T04:31:21+5:302021-04-07T04:31:21+5:30
कोरोना रुग्णांच्या उपचारात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या रेमडीसीव्हर इंजेक्शनाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी या इंजेक्शनचा काळाबाजार ...

तळोद्यातील कार्यकर्त्याकडून ६० रेमडीसीव्हीरची उपलब्धता
कोरोना रुग्णांच्या उपचारात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या रेमडीसीव्हर इंजेक्शनाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झाला असून सर्वसामान्याना इंजेक्शन उपलब्ध होणे दुरापास्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य गरजू रूग्णांना हे इंजेक्शन उपलब्ध व्हावे यासाठी तळोद्यातील कार्यकर्ते आनंद सोनार, जितेंद्र दुबे, जगदीश परदेशी, विजय मराठे हे मागील दोन दिवसांपासून रेमडीसीवर इंजेक्शनचा शोध घेण्यासाठी राज्यातील विविध शहरामध्ये जात आहेत. सोमवारी त्यांनी शिरपूर येथे जात भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.शशिकांत वाणी यांच्या प्रयत्नातून आमदार अमरिशभाई पटेल यांच्या संपर्कातून २० इंजेक्शन उपलब्ध करून घेतले. रात्री उशिरापर्यत हे इंजेक्शन तळोदा शहर व परिसरातील गरजू रुग्णांना ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात आले तर काहींना मोफत उपलब्ध करून दिले. त्यांच्या राजकीय व सामाजिक संपर्कातून रेमडीसीव्हीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवारी मालेगाव व नाशिक येथे त्यांनी धाव घेतली. या दोन्ही ठिकाणाहून त्यांनी तळोदा शहर व परिसरातील रुग्णासाठी ४० इंजेक्शनची उपलब्धता करून दिली आहे. कोरोना ग्रस्त रुग्णचा जीव वाचावा म्हणून तलोद्यातील या तरुणांनी राजकारण बाजूला ठेवत मदतीसाठी एकत्र येत स्वखर्चातून ही धडपड सुरू केली आहे. पुढील काळात ते गुजरात राज्यातील सुरत, अहमदाबाद, बडोदा या शहरातून तळोदा शहर व परिसरातील रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.