वन्यप्राण्यांच्या शिकारीचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 12:33 IST2020-05-05T12:31:54+5:302020-05-05T12:33:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील गुजरातच्या टोकावर असलेल्या भवरे येथील राखीव जंगलात वन्यजीवांच्या शिकारीचा प्रयत्न वनविभागाच्या सतर्कतेमुळे सोमवारी ...

वन्यप्राण्यांच्या शिकारीचा प्रयत्न फसला
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : तालुक्यातील गुजरातच्या टोकावर असलेल्या भवरे येथील राखीव जंगलात वन्यजीवांच्या शिकारीचा प्रयत्न वनविभागाच्या सतर्कतेमुळे सोमवारी पहाटे हाणून पाडण्यात आला. एकेरी नळीची गावठी बंदूक व लोखंडी भाला वनविभागाने जप्त केला असून संशयितांचा शोध घेतला जात आहे.
सोमवारी पहाटे पाच वाजता नंदुरबारचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांना भवरे येथील राखीव वनक्षेत्रातील वनखंड क्रमांक ५० व ५१ मध्ये काही इसम शिकारीसाठी गेल्याची गुप्त बातमी मिळाली. त्यावरुन खेकडा येथील वनपाल, वनरक्षक भवरे व वनमजूर यांना सोबत घेत मोटारसायकलीने भवरे येथे जाऊन त्यांनी जंगल गस्त करुन जंगलात शिकारीसाठी आलेल्या इसमांचा शोध घेतला. पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांना चार जण राखीव वनक्षेत्रात दिसून आले. वनकर्मचारी यांना पाहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांचा पाठलाग केला असता त्यांच्याकडील असलेले एकेरी नळीचे गावठी बंदूक व लोखंडी भाला टाकून ते पसार झाले. ते साहित्य वनकर्मचारी यांनी जप्त करुन वनरक्षक भवरे यांनी भारतीय वनअधिनियम १९२७ व वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये वन गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपवनसंरक्षक नंदुरबार, वनविभाग शहादा एस.बी. केवटे, विभागीय वनअधिकारी धुळे दक्षता विभाग उमेश वावरे, सहायक वनसंरक्षक नंदुरबार गणेश रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. ही कार्यवाही वनपाल प्रकाश मावची, वनरक्षक नितीन पाटील, वनमजूर अनिल गावीत, छगन सोनवणे, आंत्या गावीत यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
मागील तीन ते चार वर्षापासून वनक्षेत्रात अथवा वनक्षेत्राबाहेर वन्यजीवांची एकदाही शिकार झालेली नाही. अवैध बंदूक बाळगणेबाबत संशयित आरोपींवर आर्मस अॅक्ट अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. या कायद्यान्वये तीन ते सात वर्षे कारावास व २५ लाखांच्या दंडाचे प्रावधान आहे. -गणेश रणदिवे, सहायक वनसंरक्षक, नंदुरबार.