डीडीसी बँक शाखेत चोरीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 12:37 IST2020-09-09T12:37:44+5:302020-09-09T12:37:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील इंदिरा मंगल कार्यालय संकुलातील डीडीसी बॅकेची शाखा फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. ५ ते ...

डीडीसी बँक शाखेत चोरीचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील इंदिरा मंगल कार्यालय संकुलातील डीडीसी बॅकेची शाखा फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. ५ ते ७ सप्टेबर दरम्यान ही घटना घडली. याबाबत शाखाधिकारी यांनी फिर्याद दिल्याने उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. चोरट्यांच्या शोधाचे पोलिसांपुढे आव्हान आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबारातील गिरिविहार कॉलनीलगत असलेल्या इंदिरा मंगल कार्यालयात धुळे जिल्हा बँकेची शाखा आहे. बँकेला शनिवार व रविवारी सुट्टी होती. ही संधी साधून चोरट्यांनी बँक फोडण्याचा प्रयत्न केला. बँकेच्या मुख्य दरवाजाचे चॅनेल गेटला खाली लावलेले कुलूप तोडण्यात आले. त्यानंतर खालचे चॅनेल गेटचे अँगल वाकवण्यात आले.
लाकडी दरवाजाची कडी वाकवून दरवाजा उघडला. परंतु बँकेत चोरट्यांना कॅश आढळली नाही. त्यामुळे चोरटे तेथून निघून गेल्याचा अंदाज आहे.
सोमवारी सकाळी ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधणण्यात आला. वरिष्ठांच्या सुचनेवरून पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली.
शाखाधिकारी प्रभाकर वाल्मीक चकोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसात चोरीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार गायकवाड करीत आहे. दरम्यान, बँकेत सीसीटीव्ही नसल्यामुळे तपासात अडचणी येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे भितीचे वातावरण असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.