अमेरिका रिटर्न बनला असलोदचा उपसरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:28 IST2021-03-21T04:28:34+5:302021-03-21T04:28:34+5:30
विलास पवार हे पुणे येथील नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करीत होती. परंतु गेल्या मार्च महिन्यापासून कोविडच्या वाढत्या ...

अमेरिका रिटर्न बनला असलोदचा उपसरपंच
विलास पवार हे पुणे येथील नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करीत होती. परंतु गेल्या मार्च महिन्यापासून कोविडच्या वाढत्या प्रभावामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर वर्क फ्रॉम होम अंतर्गत काम केले. त्यानंतर उरलेल्या वेळेत त्यांनी गावात व शालेय परिसरात वृक्षलागवडीसह स्वच्छता अभियान, अमरधाम दुरुस्ती, गटारींची साफसफाई, विद्युत रोहित्रासह पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांना बी.एस.पी. फाऊंडेशनचे सहकार्य लाभले.
दरम्यान, यापुढेही गावाच्या विकासासाठी वेगवेगळे काम करायचा ध्यास मनाशी बाळगून त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले होते. गेल्या दोन महिन्यापूर्वीच ११ जागांसाठी ग्रामपंचायत निवडणूक झाली. त्यात भाजप पुरस्कृत बीएसपी फाऊंडेशनच्या पॅनलला आठ जागांवर बहुमत मिळाले. या वेळी एका अपक्षाच्या मदतीने सरपंच व उपसरपंच निवडणूक बिनविरोध केली.
या वेळी उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर पवार यांनी गेल्या एक महिन्यापासून सरपंच सुशीला भिल व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने गावात गटारी स्वच्छता अभियान, पिण्याच्या पाण्याची टाकी, सार्वजनिक ठिकाणची साफसफाई, महिला स्वच्छता गृहाची दुरूस्ती करून रंगरंगोटी करीत परिसर स्वच्छ केला. तसेच येत्या पाच वर्षात कोणती कामे करावयाची आहेत याचेही त्यांनी नियोजन केले असून, त्याअनुषंगाने कामे पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहेत.
विलास पवार स्वतः उच्चशिक्षित असून, अमेरिकेसारख्या देशात सहा वर्षे कंपनीने कामासाठी पाठवले. त्यांचा बॉन्ड पूर्ण झाल्यानंतर मायदेशी परतले असून पुणे येथे काम करत असताना अचानक लॉकडॉन झाल्यामुळे घरी आल्यावर वर्क फॉर्म होम अंतर्गत काम करत असताना आपल्या गावाची सेवा करावी या हेतूने अनेक विकासाची काम करून गावाचा कायापालट करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी त्यांना अनेकांचे सहकार्य लाभले. यापुढेही उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर विकासाचा आलेख सुरू ठेवला आहे.