पहिल्या टप्प्यातील विसर्जनासाठी कृत्रिम तलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 12:58 IST2020-08-26T12:57:16+5:302020-08-26T12:58:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नदी पात्रात श्री गणेश मूर्ती विसर्जन करण्यास मनाई आहे. त्याचप्रमाणे विसर्जन ...

पहिल्या टप्प्यातील विसर्जनासाठी कृत्रिम तलाव
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नदी पात्रात श्री गणेश मूर्ती विसर्जन करण्यास मनाई आहे. त्याचप्रमाणे विसर्जन मिरवणुकीवर बंदी असल्याने पहिल्या टप्प्यात घरगुती गणेश मूर्र्तींचे विसर्जन करणाऱ्या नागरिकांनी पालिकेने शहरात निर्माण केलेल्या कृत्रिम तलावात विसर्जन करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या ११ जुलैच्या नियमानुसार गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी आहे. उद्या पहिल्या टप्प्यातील पाचव्या दिवसाच्या गणरायांचे विसर्जन करण्यात येणार आहे. यासाठी शहरात पालिका प्रशासनातर्फे विजयनगर खुले मैदान, प्रेस मारूती मैदान व गणेश नगर या तीन ठिकाणी विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आलेली आहे. पाचव्या दिवशी गणेश विसर्जन करणाºया नागरिकांनी नदीपात्रावर अथवा पाणवठ्याच्या ठिकाणी न जाता या कृत्रिम तलावात श्री गणेशाचे विसर्जन करावे.
दरवर्षी विसर्जनासाठी सार्वजनिक गणेश मंडळ व घरगुती गणपती बसवणारे नागरिक प्रकाशा येथील तापी नदी पात्रावरील घाटावर मोठ्या संख्येने येत असतात. मात्र यावर्षी प्रकाशा ग्रामपंचायतीने गणेश विसर्जनासाठी केदारेश्वर येथील घाटावर बंदी घातली असल्याने नागरिकांनी येथे येऊ नये. त्याच प्रमाणे कृत्रिम तलावात विसर्जन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी केले आहे.
दरम्यान, श्री गणेश विसर्जनासाठी नागरिकांना सोयीस्कर व्हावे यासाठी पालिका प्रशासनाने नगरपालिका इमारतीसमोर त्याचप्रमाणे डोंगरगाव रस्त्यावर पटेल रेसिडेन्सी चौकात श्री गणेश मूर्ती संकलन केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे. याठिकाणी शहरातील विविध भागातील घरगुती गणेशोत्सव साजरा करणाºया नागरिकांनी पहिल्या टप्प्यातील विसर्जनासाठी आपल्या घरून श्री गणेश मूर्ती आणाव्यात. पालिकेमार्फत या दोन्ही केंद्रावर त्या संकलित केल्या जातील. त्याच प्रमाणे पालिकेतर्फे त्यांचे विधिवत विसर्जन केले जाईल. नागरिकांना या संकलन केंद्रापर्यंत येण्यासाठी अडचण होऊ नये याकरिता पालिका प्रशासनाने दोन संकलन रथांची निर्मिती केली असून, शहरातील विविध भागात हे रथ घरोघरी जाऊन श्रीगणेश मूर्र्तींचे संकलन करणार आहेत. या रथांना आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले आहे. नागरिकांनी पहिल्या टप्प्यात विसर्जन करताना कृत्रिम तलावात र्श्रींचे विसर्जन करावे. त्याचप्रमाणे ज्यांना हे शक्य नाही अशांनी पालिका प्रशासनाने कार्यान्वित केलेल्या संकलन केंद्रावर विसर्जनासाठी गणेशमूर्ती द्याव्या, असे आव्हान मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले.