बाजारात चायना मालाची आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 12:24 IST2020-10-14T12:24:18+5:302020-10-14T12:24:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दिवाळीसाठी बाजारपेठ सज्ज होवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात चायनीज मालाची आवक वाढण्याची शक्यता ...

बाजारात चायना मालाची आवक घटली
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दिवाळीसाठी बाजारपेठ सज्ज होवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात चायनीज मालाची आवक वाढण्याची शक्यता होती. परंतु यंदा बाजारात काहीअंशी उलट स्थिती असल्याचे दिसून आले आहे. बाजारात चायनीज मालच आलेला नसल्याचे व्यापार्यांचे म्हणणे आहे.
शहरात दिवाळीत चायनीज लायटींग, शोभेच्या वस्तू, पणत्या यासह विविध वस्तूंची मोठी आवक केली जाते. सुरत, अहमदाबाद, दिल्ली, इंदाैर, मुंबई, कल्याण यासह इतर शहरात या मालाची आवक होते. शहरातील ठोक व्यापार्यांचे संपर्क असल्याने तेथून हा माल शहरात येतो. कोरोनामुळे चायनीज मालाबाबत निर्माण झालेली साशंकता आणि देशभरात चायनीज वस्तू वापराबाबत असलेले विरोधी वातावरण यामुळे यंदा दिवाळीपूर्वी होणारी मालाची आवक थांबली आहे. यामुळे व्यापारी हाती असलेल्या दिल्ली किंवा इंदाैरमेड मालाचा वापर करुन काम भागवत आहेत. खासकरुन दिवे आणि आकाशकंदील यांची मोठी आवक चीनमधून दरवर्षी होते. परंतु यंदा मात्र ही आवक झालेली नसल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. गेल्या काही वर्षात चायनीज मालाने भारतीय दिवाळी काबीज केली होती. यातून बाजारात स्वस्त वस्तू उपलब्ध होत होत्या.
परंतु यंदा चायनीज माल उपलब्ध धने स्वदेशी वस्तूंची मागणी वाढल्यास तेवढा पुरवठा होणे शक्य नसल्याने दिवाळीत किरकोळ वस्तूंचे दर महागण्याची शक्यताही बोलून दाखवण्यात आली.
मोबाईल बाजारपेठेत येणार तेजी
इलेक्ट्राॅनिक बाजारपेठ मात्र बर्यापैकी तेजीत असल्याचे सांगण्यात येत आहे. बाजारात चायनीज बनावटीचे मोबाईल्स आणि इतर वस्तू विक्रीसाठी आहेत. मोबाईल बाजारात ब्रँडेड मोबाईल्समध्ये ६० टक्के कंपन्या ह्या चायनीज किंवा संबधित मोबाईलची बनावट ही चायनीज तंत्रज्ञानातून असल्याची माहिती देण्यात आली. दिवाळीत मोबाईल्सची विक्री वाढणार आहे.
बाजारात सध्या मालाची आवक कमी आहे. चायनीज लायटींगला मागणी असली तरी यंदा माल नसल्याने ग्राहकही विचारणा करत नसल्याचे चित्र आहे. देशी लायटिंग सध्या उपलब्ध आहे.
-निहाल ठाकूर,
लायटींग विक्रेता. नंदुरबार.