शरद पवारांचा दौरा रद्द झाल्याने तर्कवितर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 10:01 PM2020-11-19T22:01:52+5:302020-11-19T22:01:59+5:30

n  रमाकांत पाटील     लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नंदुरबार जिल्ह्याचा दौरा अचानक ...

Argument over cancellation of Sharad Pawar's tour | शरद पवारांचा दौरा रद्द झाल्याने तर्कवितर्क

शरद पवारांचा दौरा रद्द झाल्याने तर्कवितर्क

Next

n  रमाकांत पाटील
    लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नंदुरबार जिल्ह्याचा दौरा अचानक रद्द झाल्याने राजकीय गोटात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान खान्देशचे नेते एकनाथ खडसे हे क्वॉरंटाईन असल्याने तसेच विधान परिषद निवडणुकीची आचार संहितेमुळे हा दौरा रद्द झाल्याचे पक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
गेल्या विधान सभा निवडणुकी पूर्वीच्या पक्षांतराच्या लाटेत जिल्ह्यातील तेव्हाच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावीत यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी सोडल्याने गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची घडी विस्कळीत झाली होती. अनेक महिने नवीन जिल्हाध्यक्षांची निवडही करण्यात आली नव्हती. दोन महिन्यापूर्वीच डॉ.अभिजित मोरे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पक्षाची नवीन बांधणी सुरू केली. माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पक्षाच्या नवीन बांधनीला गती आली होती. त्यातच काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यातही या पक्षाच्या आशा वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा नंदुरबार जिल्हा दौरा जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. त्यासाठी डॉ.अभिजित मोरे, उदेसिंग पाडवी यांनी गावो गावी बैठका घेवून शरद पवार यांच्या मेळाव्याची तयारी सुरू केली होती.
अर्थातच पक्षाची नवीन बांधणी सुरू असतानाच पवारांचा मेळावा लागल्याने त्यांना साजेसा मेळावा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची कस लागली होती. या मेळाव्याला भव्य कसा करता येईल याची चिंता पदाधिकाऱ्यांना होती. त्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. अशीच तयारी सुरू असताना अचानक पवार यांचा दौरा रद्द झाल्याचा निरोप मिळाला. पक्षाचे धुळे-नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी अनिल गोटे यांनी अधिकृतपणे तो जाहीर केला. अचानक दौरा रद्द झाल्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये अनेक मते मतांतर मांडले जात आहेत. 
एकनाथ खडसे हे क्वॉरंटाईन असल्याने ते येऊ शकत नाही. शिवाय धुळे-नंदुरबार विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्याने आचार संहितेमुळे हा दाैरा रद्द झाल्याचे कारण पक्षाचे नेते सांगता आहेत. पण कार्यकर्त्यांमध्ये पक्षातील अंर्तगत गटबाजीची चर्चाही सुरू आहे. अर्थात नंदुरबार जिल्ह्यात गटबाजी कमी असली तरी धुळे जिल्ह्यात मात्र मोठ्या प्रमाणावर वाद सुरू असल्याचे सांगितले जाते. हे वाद थेट पक्ष कार्यालयापर्यंत गेल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळेच दौरा रद्द झाल्याचे सांगितले जाते. तर नंदुरबार जिल्ह्यात मेळाव्याला गर्दी कमी होईल असे पक्षांतर्गत वरिष्ठ पातळीतील सर्वेक्षणात सांगितले गेल्याने नंदुरबारचा मेळावा रद्द केल्याचेही बाेलले जात आहे.
अर्थात कारणे काहीही असले तरी राजकीय गोटात शरद पवारांचा दौरा रद्द होण्याबाबत विविध तर्क वितर्क काढले जात आहेत. वास्तविक शरद पवार हे अनेक वर्षानंतर नंदुरबार जिल्ह्यात येणार होते. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांबरोबरच इतर वर्गाचेही त्यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागले होते. पवार हे स्वत: सत्तेत नसले तरी राज्याच्या सत्तेचे मुख्य आधार असल्याने त्यांच्या दौऱ्याने निश्चितच जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावरही चर्चा झाली असती. विशेषत: शरद पवार व खडसे हे एकाच व्यासपीठावर आले असते तर उपसा योजना पुनर्रूजीवनचा प्रश्न व सिंचनाच्या प्रश्नावर निश्चित चर्चा होऊन त्यातून काही फलीत निघाले असते. त्यामुळे दौरा रद्द झाल्याने जिल्हावासियांचाही हिरमोड झाला आहे.

Web Title: Argument over cancellation of Sharad Pawar's tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.