पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST2021-06-10T04:21:31+5:302021-06-10T04:21:31+5:30
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना प्रकल्प स्वरूपात राबविण्यात येत असून, राज्य शासनाकडून ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी ...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना प्रकल्प स्वरूपात राबविण्यात येत असून, राज्य शासनाकडून ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा आणि इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटिका उभारणी करणे गरजेचे राहील. प्रकल्पात समाविष्ट शेडनेट गृह
एक हजार चौ.मीटर, पॉलिटनेल एक हजार चौ.मी. (ऐच्छिक), एक पॉवर नॅपसॅक स्पेअर पंप, ६२ प्लास्टिक कॅरेटस् या घटकांचा एकूण प्रकल्प खर्च चार लाख ६० हजार असून, प्रकल्पाला ५० टक्क्यांप्रमाणे २ लाख ३० हजार रुपये अनुदान देय राहील.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान १ एकर जमीन आणि पाण्याची कायमची सोय असणे आवश्यक आहे. महिला कृषी पदवीधारकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून, महिला शेतकरी गटाला द्वितीय प्राधान्य राहणार आहे. यानंतर भाजीपाला उत्पादक अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आणि शेतकरी गटांना प्राधान्य असणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एन.बी. भागेश्वर यांनी केले आहे.