आग मागे अन् सारा गाव जागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:59 IST2021-03-04T04:59:13+5:302021-03-04T04:59:13+5:30

नंदुरबार ते साक्री रस्त्यावर ठाणेपाडा गावालगत वनविभागाची रोपवाटिका आहे. या रोपवाटिकाच्या दोन्ही बाजूला साक्री तालुका हद्दीतील सिंदबनपर्यंत विस्तीर्ण असं ...

Ansara village wakes up behind the fire | आग मागे अन् सारा गाव जागे

आग मागे अन् सारा गाव जागे

नंदुरबार ते साक्री रस्त्यावर ठाणेपाडा गावालगत वनविभागाची रोपवाटिका आहे. या रोपवाटिकाच्या दोन्ही बाजूला साक्री तालुका हद्दीतील सिंदबनपर्यंत विस्तीर्ण असं ६०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात विस्तीर्ण वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रात सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आग लागल्याचे ग्रामस्थांना दिसून आले. त्यांनी तातडीने हालचाली करत वनविभागाला माहिती, रोपवाटिकेत नियुक्तीवर असलेल्या वन कर्मचारी व अधिकारी यांना संपर्क केला. प्रारंभी आग लवकर आटोक्यात येईल असे वाटत असतानाच, कोरड्या गवताला आगीची झळ बसल्याने वाऱ्याच्या वेगाने आग फोफावत गेली. आसपास असलेल्या टेकड्यांवरची ही आग शेतशिवारापर्यंत येवून पोहोचली. याठिकाणी गहू आणि हरभरा कापणीवर आला असल्याने तेथे आग लागल्यास गावात आग लागण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांनी रात्रीतून साधारण ५०० मीटरपर्यंतचे गवत मशिन आणि हाताने कापून काढत बचाव कार्य केले. सरपंच भारती पवार आणि जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार यांनी ग्रामस्थांना सोबत घेत हे बचाव कार्य पहाटेपर्यंत सुरु ठेवले.

ग्रामस्थ वनकर्मचाऱ्यांना गटागटाने मदत करत झाडांच्या ओल्या फांद्या तसेच मशिनद्वारे आणि हाताने गवताची ओळ कापण्यासाठी गट अहाेरात्र काम करत होते. सकाळी आठ वाजता आग विझवण्यात यश आले असले तरी जंगलातील विविध भागात दुचारी चारवाजेपर्यंत धूर येत असल्याने वनअधिकारी व कर्मचारी ग्रामस्थांच्या मदतीने तेथवर पोहोचून तो परिसरात बंदिस्त करत होते.

आग पाहून आमचा जीव जळाला...

आगीची घटनेची माहिती सुटीवर असलेल्या एका वनरक्षकाला मिळल्यानंतर त्यांनी ठाणेपाड्याकडे धाव घेतली. यावेळी त्यांनी अत्यंत भावुक होत सांगितले की, आगीची घटना पाहून झोप लागत असतानाही राहवले नाही. या वनक्षेत्रासाठी तीन वर्षांपासून खूप मेहनत घेतली होती आगीमुळे ही सर्व मेहनत वाया गेली आहे. बांबू रोपवन हा वनविभागाचा अत्यंत खास आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता.

आश्रमशाळेच्या मागे आग

ठाणेपाडा गावापासून काही अंतरावर मुख्य रस्त्यालगत आदिवासी विकास विभागाची निवासी आश्रमशाळा आहे. आगीची सुरुवात आश्रमशाळेच्या मागून झाली होती. यावेळी येथील शिक्षकांनी दक्षता म्हणून हजर असलेल्या विद्यार्थी व कर्मचारी यांना सुरक्षितस्थळी हलवल्याची माहिती आहे.

सुझलाॅन टाॅवर

वनक्षेत्राच्या मधोमध पवन ऊर्जा प्रकल्पाचा टाॅवर आहे. आग लागल्यानंतर हा टाॅवर बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. संबंधित कंपनीचे कर्मचारी या भागात येऊन हजर झाले होते. परंतु आग न पोहोचल्याने अनुचित प्रकारही टळला. सकाळी टाॅवरपर्यंत मात्र कर्मचारी जाऊ शकले नाहीत.

पती-पत्नी धावले : आग लागल्याची माहिती वनविभागाला प्रथम जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार यांनी वनविभागाला कळवली. त्यांच्या पत्नी सरपंच भारती याही रात्रभर गावात थांबून सर्वांना दिलासा देत होत्या. दोघांच्या मार्गदर्शनात ग्रामस्थ वनविभागाला सहकार्य करत होते.

जवळून गेला मोर अन् बिबट्या समोर...

ठाणेपाडा वनक्षेत्र हे वन्य प्राण्यांनी समृद्ध आहे. याठिकाणी दोन बिबटे, दुर्मिळ प्रजातीचे काळवीट आणि मोर आहेत. आगीची घटना घडल्यानंतर दुचाकींवरून ग्रामस्थ कुठे आग कमी व जास्त याची माहिती घेत वनविभागाला देत होते. यावेळी एका गटाला मोर समोरुन गेल्याचे दिसले. याचवेळी अत्यंत धष्टपुष्ट असा बिबट्याही समोरुन निघून गेला. अत्यंत जवळून जाणारे वन्यप्राणी पाहून काहींची भंबेरी उडाली परंतु आगीच्या घटनेनंतर हे वन्यप्राणी दुसरा मार्ग शोधत सैरावैरा पळून निघून गेले. वन्यप्राणी कापरा तलाव आणि सिंदबनकडे गेल्याचे तसेच मोर मात्र गावशिवारातील शेतातच असल्याचे दिसून आले.

आग विझवण्यासाठी नवापूर व नंदुरबार तालुक्यातील वनविभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. त्यांच्याकडून आग विझवण्यासाठी मदत करण्यात आली. दरम्यान ठाणेपाडा ग्रामस्थांनी मोलाची मदत केली. आग लावली किंवा लागली याचा तपास वनविभाग करत आहे. आगीत एकाही प्राण्याची जीवितहानी झालेली नाही.

-धनंजय पवार,

सहायक वनसंरक्षक, नंदुरबार.

Web Title: Ansara village wakes up behind the fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.