खांडबारा येथे आणखी एक पॉझिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 12:51 IST2020-07-28T12:51:09+5:302020-07-28T12:51:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खांडबारा : नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील बर्डीपाड्याच्या कर्मचारी सोसायटीमधील ५० वर्षीय महिलेनंतर आता २० वर्षी युवकास ...

खांडबारा येथे आणखी एक पॉझिटीव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
खांडबारा : नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील बर्डीपाड्याच्या कर्मचारी सोसायटीमधील ५० वर्षीय महिलेनंतर आता २० वर्षी युवकास त्रास होत असल्याने त्यास सुरत येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्याचा सोमवारी कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्याने बाजारपेठेतील दुकान असलेला भाग सील करण्यात आला आहे.
या युवकाच्या संपर्कात असलेल्या ३२ जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तसेच १६ व्यावसायिकांशी संपर्क झाल्याने त्या सर्व दुकानदारांना १४ दिवस दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत वसावे यांनी दिली.
या वेळी युवक राहत असलेला व बाजारपेठेतला काही भागात बॅरिकेटींग करून आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने संपूर्ण बाजारपेठ व युवक राहात असलेल्या परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी केली आहे.
या घटनेमुळे खांडबारा येथे भितीचे वातावरण निर्माण झाले असून, कोणीही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा, नियमित मास्क लावूनच बाहेर पडावे, असे आवाहन आरोग्य प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
दरम्यान नायब तहसीलदार रमेश कोकणी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत वसावे, डॉ.योगेश वळवी, डॉ.तुषार वसावे व संपूर्ण आरोग्य कर्मचारी टीम, ग्रामपंचायत प्रशासन यांनी भेट देवून उपाययोजना करण्यात आल्यात. तसेच कर्मचारी सोसायटीमधील ५० वर्षीय महिलेच्या संपर्कातील चार जणांचे स्वॅब घेण्यात आले असून, ते तपासणी करण्यासाठी लॅबकडे पाठविण्यात आले आहे.