नंदुरबारात आणखी एक ॲाक्सीजन निर्मिती प्लान्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:18 IST2021-03-29T04:18:09+5:302021-03-29T04:18:09+5:30

नंदुरबार : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता व लागणारे ॲाक्सीजन पहाता जिल्हा रुग्णालयात तातडीने दुसरा ॲाक्सीजन प्लान्ट तयार ...

Another Oxygen Production Plant at Nandurbar | नंदुरबारात आणखी एक ॲाक्सीजन निर्मिती प्लान्ट

नंदुरबारात आणखी एक ॲाक्सीजन निर्मिती प्लान्ट

नंदुरबार : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता व लागणारे ॲाक्सीजन पहाता जिल्हा रुग्णालयात तातडीने दुसरा ॲाक्सीजन प्लान्ट तयार करण्यास युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्यात पहिला ॲाक्सीजन प्लान्ट तयार करण्यात आला होता. आता दुसरा प्लान्ट तयार करण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील ॲाक्सीजनची मागणीची पुर्तता पुर्ण होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, ॲाक्सीजन बेड वाढविण्यासाठी ठिकठिकाणी सुविधा तयार करण्यात येत आहे. तर तळोदा येथे आणखी एक कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे.

कोरोनाने सद्या हाहाकार माजविला आहे. दररोज वाढणारे पेशंटमुळे दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये जागा नाही. ॲाक्सीजन लागणारे पेशंट सर्वाधिक आहेत. त्यामुळे ॲाक्सीजन बेड मिळविण्यासाठी विनवण्या केल्या जात आहेत. परिणामी ॲाक्सीजन सिलिंडरची संख्या कमालीची वाढली आहे. येथील ॲाक्सीजन प्लान्टमध्ये दररोज १२५ सिलिंडर ॲाक्सीजन निर्मिती होती. ती कमी पडत असल्याने धुळे येथून दररोज तेवढेच सिलिंडर मागविले जात आहेत. तरीही मागणी कायम आहे. ही बाब लक्षात घेता तातडीने दुसरा प्लान्ट तयार करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी डॅा.राजेंद्र भारूड यांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिला आहे.

पहिला प्लान्ट

जिल्ह्यात पहिला ॲाक्सीजन निर्मितीचा प्लान्ट जिल्हा रुग्णालयात सप्टेंबर महिन्यात कार्यान्वीत झाला होता. त्यावेळी कोरोना रुग्ण कमी राहत असल्यामुळे त्यावेळच्या परिस्थिनुसार जिल्हा ॲाक्सीजन सिलिंडरबाबत स्वयंपुर्ण झाला होता. या प्लान्टची निर्मिती एक कोटी १९ लाख रुपये खर्च करून करण्यात आली होती. त्यातून दररोज १२५ जम्बो सिलिंडर ॲाक्सीजन निर्मिती होत असते. अवघ्या दोन आठवड्यात हा प्लान्ट उभारण्यात आला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाचे वेळ व पैसाही वाचण्यास मदत झाली. तातडीने ॲाक्सीजन पुरवठा देखील मागणीप्रमाणे उपलब्ध केला जात होता.

परिस्थिती बदलली

कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात सक्रीय झाली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून मोठ्या संख्येने रुग्ण आढळू लागले आहेत. जिल्ह्यात एका दिवसात तीनशेपेक्षा अधीक रुग्णसंख्या गेली नव्हती ती यावेळी सहाशेपेक्षा अधीक गेली आहे. मृत्यूची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. आढळणाऱ्या रुग्णांपैकी अनेकांना ॲाक्सीजन सिलिंडरची गरज लागत असल्याने त्यांना ते पुरविण्यासाठी कसरत होत आहे. यापुढे आणखी बेडची गरज राहणार असल्याने नियोजन करण्यात येत आहे.

जिल्ह्यात शासकीय व खाजगी मिळून जवळपास ६०० ॲाक्सीजन बेडची संख्या आहे. त्यांना ॲाक्सीजन पुरविण्यासाठी जिल्ह्यात पुरेसा साठा नाही. जिल्हा रुग्णालयातील ॲाक्सीजन प्लान्टमधून निघणारे दररोजचे १२५, धुळे येथून येणारे १२५ असे अडीचशे जम्बो सिलिंडर दररोज उपलब्ध होत आहे. त्यामुळे शॅार्टेज वाढले आहे. दुसरा प्लान्ट सुरू झाल्यास त्यातून दररोज १२५ जम्बो सिलिंडर ॲाक्सीजन निर्मिती होणार असल्याने तो मोठा दिलासा मिळणार आहे.

रुग्णांकडून ॲाक्सीजन बेडचीच मागणी...

कोरोनाची कमी लक्षणे असली तरी रुग्णांची ॲाक्सीजन बेडचीच मागणी असते. अशा वेळी त्यांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. काही वेळा वेटींगवर ठेवावे लागते. त्यामुळे कमी त्रास होत असल्यास विनाकारण ॲाक्सीजन बेडची मागणी करू नये. यामुळे खरोखर गरज असणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ शकते. जिल्हा रुग्णालयात तर ही परिस्थिती दररोज निर्माण होत आहे.

Web Title: Another Oxygen Production Plant at Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.