बिलाडी शिवारात दुसरा पिंजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 13:03 IST2021-02-05T13:02:55+5:302021-02-05T13:03:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यातील बिलाडी ससदे परिसरात बिबट्याच्या भितीने ग्रामस्थ रात्री जागून काढत आहेत. ही ...

बिलाडी शिवारात दुसरा पिंजरा
लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : शहादा तालुक्यातील बिलाडी ससदे परिसरात बिबट्याच्या भितीने ग्रामस्थ रात्री जागून काढत आहेत. ही भिती दूर करण्यासाठी वनविभागातर्फे बुधवारी दुपारी एक पिंजरा लावण्यात आला होता. परंतू यानंतरही रात्री पुन्हा तापी काठावरील गावठाणातून बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू आल्यानंतर वनविभागाने दुसरा पिंजरा बिलाडी गावाशेजारी लावत बिबट्या पकडण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे.
बिलाडी ससदे परिसरात संचार करणारा बिबट्या जेरबंद करण्यासाठी बुधवारी दुपारी पिंजरा लावण्याची कारवाई वनविभागाने केली होती. परंतू यानंतरही बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास स्वाध्याय परिवाराच्या अमृतालय परिसरातून अचानक बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू येवू लागल्यानंतर भयभीत ग्रामस्थांनी वनविभागाला संपर्क करत माहिती दिली होती. यानुसार वनविभागाच्या पथकाने येथे भेट देत बिबट्याचा मग काढून आणखी एक पिंजरा लावला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन खुने यांच्या मार्गदर्शनात वनपाल डी.बी. जमदाळे, पी.आर.वाघ, एस.एच. राठोड, जी.आर.वसावे, विनायक पाटील, नईम मिर्झा यांच्या पथकाने रात्री उशिरापर्यंत थांबून पिंजरे लावण्याची कारवाई केली. दरम्यान सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनीही या भागात भेट देत पाहणी केली.
बिबट्याच्या संचारामुळे परिसरात सध्या शेतात पाणी भरण्याचं काम पूर्ण थांबले आहे. वीज पुरवठा केवळ रात्री होत असल्याने शेतक-यांनी कंपनीच्या अधिका-यांकडे वीज पुरवठा दिवसा व्हावी अशी मागणी केली आहे. बिलाडी ससदे परिसरात तापी काठावरील गावठाण जागेवर काटेरी बाभळीची असंख्य झाडे उगवली आहेत. यात तापी पात्र तुडूंब भरले बिबट्याला मोक्याची जागा मिळाली आहे. यातून या भागातून सहज ये-जा करणे शक्य असल्याने हा वन्यजीव इकडे आला असावा असा अंदाज आहे. दरम्यान सरपंच जवाहर पाटील, पोलीस पाटील ईश्वर पाटील, वसंत पाटील हे सातत्याने वनविभागाच्या संपर्कात आहेत.