Annual Plan of Rs. 3 crore approved for district planning | जिल्हा नियोजनाचा ३५० कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर
जिल्हा नियोजनाचा ३५० कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा ग्रंथालयाची अत्याधुनिक साडेतीन कोटी रुपये खर्चाची इमारत उभारणे, आश्रमशाळांमध्ये गिझर आणि आरओ फिल्टर बसविणे यासह तोरणमाळचा पर्यटन विकास करण्याच्या मुद्दयावर जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान, जिल्हा नियोजनाचा साडेतीनशे कोटींचा प्रारुप आराखड्यास मंजुरी देण्यात आली.
बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा अ‍ॅड. सीमा वळवी, खासदार डॉ.हिना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, शिरीषकुमार नाईक, राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सुर्यवंशी आदी उपस्थित होते. सर्वसाधारण योजनेअंतर्गत ६९ कोटी ५७ लाख, आदिवासी उपयोजना २६५ कोटी ३७ लाख, आदिवासी उपक्षेत्राबाहेरील उपयोजना तीन कोटी ६८ लाख आणि अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ११ कोटी ७३ लाख रुपयांचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला असून तो राज्यस्तरीय समितीकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे.
बैठकीत शहादा येथील रुग्णालयात पुर्णवेळ डॉक्टरची सेवा, आश्रमशाळांमध्ये आरओ यंत्रणा व गिझरची सुविधा, जनसुविधा आणि ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत कामे करण्यास प्राधान्य देण्याच्या सुचना करण्यात आल्या. ग्रामपंचायतींना सोलर पंप बसविणे, तोरणमाळ येथील विद्युत उपकेंद्र, शिधापत्रिकांची आॅनलाईन नोंदणी, शासकीय आश्रमशाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात बायोमेट्रीक यंत्रणा बसविणे, जि.प.शाळांमधील वर्ग खोल्या उभारणे आदी विविध विषयांवर चर्चा झाली.
साडेतीन कोटींचे ग्रंथालय
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त असणाऱ्या ग्रंथालयाच्या साडेतीन कोटी रुपयांच्या बांधकामास मंजूरी देण्यात आली. जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत संबंधितांनी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. धडगावला पाणीपुरवठा करू शकणाºया भुजगाव पाझर तलाव दुरुस्ती आणि तोरणमाळ पर्यटन केंद्र म्हणून विकसीत करण्याबाबत यावेळी निर्णय घेण्यात आला. आश्रमशाळांमध्ये सुविधा निर्माण केल्यानंतर त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देण्यात यावे. शिधापत्रिका आॅनलाईन नोंदणीचे काम त्वरीत पुर्ण करण्याच्या सुचना मंत्री अ‍ॅड.पाडवी यांनी दिल्या.
अधिकाऱ्यांची चौकशी करा
सोलर पंप बसविण्यात दिरंगाई होत असल्याने संबंधितांची चौकशी प्रस्तावीत करण्यात यावी. जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी आणि युवकांकडे खेळासाठी आवश्यक गुणवत्ता आणि क्षमता आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण मिळावे यासाठी क्रीडा संकुलाचा अधिकाधिक उपयोग होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. जिल्हा क्रीडा संकुलाकडे जाणाºया रस्त्यावरील काटेरी झुडुपे स्वच्छ करण्यात यावी.
खेळाडुंना अधिकाधिक प्रोत्साहन द्यावे, आदिवासी विभागामार्फत त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
८६ वर्ग खोल्या तातडीने करा
जिल्हा परिषद शाळेतील वर्गखोल्यांचा आढावा घेताना पालकमंत्री म्हणाले, वर्ग खोल्या उभारतांना खाजगी कच्च्या घरात भरणाºया ८६ शाळांमधील काम प्राधान्याने करावे. १० किंवा १५ वर्गखोल्यांचा एकत्रित प्रस्ताव करून वैशिष्टेपुर्ण बांधकाम होईल असे नियोजन करावे. शाळेचे बांधकाम करताना कामाच्या दर्जाकडे अधिकाºयांनी लक्ष घालावे, असे निर्देश त्यांनी दिले. घरकूलांसाठी आवश्यक निधी केंद्राकडून मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीपूर्र्वी वीर बिरसा मुंडा सभागृहाच्या नुतनीकरण कामाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. बैठकीस जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

शहादा रुग्णालयात पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नेमणार.
ग्रामपंचायतींना सोलर पंप बसविण्यासाठी अनुदान देण्यात येणार.
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बायोमेट्रीक यंत्रणा बसविणार.
जिल्हा परिषद शाळांसाठी वर्ग खोल्या बांधण्याकरीता नियोजन करणार.
धडगावला पाणी पुरवठा करणाºया भुजगाव पाझर तलाव दुरूस्ती करण्यास मान्यता.
जिल्हा क्रिडा संकुलात अधिकाधिक सुविध उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार.
रखडलेल्या घरकुलांसाठी केंद्राकडून निधी उपलब्ध करून घेणार.

Web Title: Annual Plan of Rs. 3 crore approved for district planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.