लेवा पाटीदार गुजर समाजाचे प्रकाशा येथे वार्षिक अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 13:09 IST2019-11-03T13:09:05+5:302019-11-03T13:09:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचे वार्षिक अधिवेशन प्रकाशा येथील श्री अन्नपूर्णा माता मंदिराच्या प्रांगणात ...

लेवा पाटीदार गुजर समाजाचे प्रकाशा येथे वार्षिक अधिवेशन
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचे वार्षिक अधिवेशन प्रकाशा येथील श्री अन्नपूर्णा माता मंदिराच्या प्रांगणात शनिवारी घेण्यात आले. या अधिवेशनात समाजहिताचे विविध 19 ठराव मंजूर करण्यात आले.
अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी अ.भा. गुजर समाजाचे अध्यक्ष दीपक पाटील होते. व्यासपीठावर महिला आघाडीच्या अध्यक्षा कमलताई पाटील, सुमनबाई मोहन पटेल, विमलबाई करसन चौधरी, कांचन दीपक पाटील, माधवी मकरंद पाटील, मंगलाबाई मोहन चौधरी, डॉ.सविता अनिल पाटील, जि.प.चे माजी सदस्य रामचंद्र पाटील, मोहन काशीनाथ चौधरी, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, भरत सुदाम पटेल, दीपकनाथ एकनाथ पाटील, हरी दत्तू पाटील, रवींद्र शंकर पाटील, दशरथ विठ्ठल पाटील, दिलीप दगडू पाटील, शिवदास काशीनाथ चौधरी, किशोर रतन पटेल, सुनील श्रीपत पटेल, गोविंद पुरुषोत्तम पाटील, राकेश सुभाष पाटील, शितल हितांशू पटेल, रवींद्र हांडू गुजर, सुभाष सुदाम पटेल, डॉ.सतीश नरोत्तम चौधरी, दिलीप दगडू पाटील उपस्थित होते.
या वेळी विविध क्षेत्रात यश मिळविणा:या समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यात चेन्नई येथून बी.टेकची पदवी घेतलेले अभिषेक मनोज पाटील, पीएच.डी. पदवी प्राप्त करणारे प्रा.डॉ.दत्तात्रय दशरथ पटेल (भरवाडे), होमिओपॅथी महाविद्यालयात प्रथम आलेल्या डॉ.देवयानी शांतीलाल पाटील (शिंदे), पत्रकारिता व जनसंवाद परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या प्रा.हितेंद्र सतीश चौधरी (पाडळदा) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दीपक पाटील म्हणाले की, समाजाने केलेले नियम सर्वानी पाळले पाहिजेत. आपले आचरण नेहमी चांगले असावे. कारण तरुण पिढी ज्येष्ठांचे अनुकरण करतात. समाजहिताच्या कामासाठी राजकारण न करता कोण कोणत्या पक्षाचा आहे या गोष्टीला स्थान देऊ नये. आपसांत भांडण न करता समाज बांधवांना मदत करावी. कार्यकारिणीतील सर्व समाज बांधवांनी बैठकीला आले पाहिजे असे सांगून गावागावात आजच कार्यकारिणी गठीत करण्याचे आवाहन त्यांनी केले. सुदाम पाटील (कोळदे), के.डी. पाटील (शहादा), ईश्वर भूता पाटील, सुमनबाई पाटील (लोणखेडा), श्रीपत पटेल (वेळदा), प्रा.मोहन पटेल, नुपूर पाटील, किशोर पाटील (शहादा), जयप्रकाश पाटील (मोहिदा), प्रमोद पाटील (वरुळ कानडी) यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सुनील सखाराम पाटील यांनी तर सूत्रसंचालन हरी पाटील यांनी केले.
समाजहितासाठी 19 ठराव मंजूर
या अधिवेशनात समाजहितासाठी विविध 19 ठराव मांडण्यात आले होते. या ठरावांना मंजुरी देण्यात आली. त्यात साखरपुडय़ात ‘खाऊ’ करण्याची पद्धत बंद करावी. साखरपुडय़ाच्यावेळी वधू-वर पक्षाकडून चारपेक्षा अधिक व्यक्तींनी जाऊ नये. वरासाठी रुमाल, टोपी व शाल तर वधूसाठी साडी व ब्लाऊज न्यावे. दागिने न करता सव्वाशेर साखर व सव्वाशेर खारीक पाठवावी. या समारंभात फक्त चहा-बिस्कीट द्यावे. फराळ व जेवण बंद असावे. तसेच साखरपुडय़ासाठी वाजंत्री वाजवू नये. जास्तीत जास्त समाज बांधवांनी सामुदायिक विवाह, मंदिर लग्न किंवा कोर्ट मॅरेज यात सहभाग नोंदवावा. जेणेकरुन विवाहप्रसंगी अनावश्यक खर्चास आळा बसेल. लग्नानिमित्त वर व वधू पक्षाकडून एकच पंगत व्हावी. लग्नपत्रिका साधी असावी. लग्नपत्रिका पाठविण्यासाठी आवश्यक तेवढय़ाच वाहनांचा उपयोग करावा. लग्न समारंभात एकच मिठाई असावी. वरातीसोबत वरपक्षाकडून 50 पेक्षा जास्त व्यक्तींनी जाऊ नये. द्वारदर्शनासाठी येणा:यांना चहापान वगैरे करू नये, बैठकही साधीच असावी. सहामाही, वर्षश्राद्धा आदीनिमित्त होणारी जेवणावळ बंद ठेवावी, फक्त कुटुंबीयांपुरतेच मर्यादित ठेवावे आदी ठरावांचा समावेश होता.
यंदाचा सामूहिक विवाह सोहळा मनरदला
गुजर समाज पंचतर्फे दरवर्षी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. सन 2020 मध्ये होणारा सामूहिक विवाह सोहळा मनरद, ता.शहादा येथे होणार आहे. मनरद, लांबोळा, करजई, बुपकरी व डामरखेडा ही पाच गावे मिळून हा सोहळा होणार आहे. 30 जानेवारी 2020 रोजी हा सामूहिक विवाह घेण्याचे अधिवेशनात ठरविण्यात आले.