शहादा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 11:54 IST2019-02-27T11:52:47+5:302019-02-27T11:54:51+5:30
शहादा तालुका : ५ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात, २४ मार्चला मतदान

शहादा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
शहादा : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींची येत्या मार्च महिन्यात मुदत पूर्ण होत असल्याने या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या ५ मार्चपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार असून २४ मार्च रोजी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मनोज खैरनार यांनी दिली.
येत्या मार्च महिन्यात तालुक्यातील जुनवणे, पिंपळोद, शिरुड दिगर, बुपकरी व वरूळ तर्फे शहादा या पाच ग्रामपंचायतींची मुदत पूर्ण होत असल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. लोकनियुक्त सरपंचपदासाठी पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने अनेक इच्छुकांनी उमेदवारी करण्यासाठी गटनेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. तालुक्यातील शिरुड दिगर, वरूळ तर्फे शहादा व बुपकरी या ग्रामपंचायती राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. येत्या ५ मार्चपासून सरपंचपदासाठी व ग्रामपंचायत सदस्यपदासाठी उमेदवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होत आहे. ९ मार्चपर्यंत नामनिर्देशन भरण्याची शेवटची मुदत असून ११ मार्च रोजी दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी, १३ मार्चला नामनिर्देशन पत्र माघार घेण्याची व रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार आहे. २४ मार्च रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार असून २५ मार्चला सकाळी १० वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. या पाच ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याअगोदर अधिकृत मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी निर्णय अधिकारी म्हणून सुनील गावीत, प्रशांत देवरे, बी.ओ. पाटील , डी.बी. बेलदार, पी.डी. गिरासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना कार्यालय कर्मचारी आनंद महाजन, किशोर भांदुर्गे हे सहकार्य करणार आहेत. गेल्या आठवड्यातच सुलतानपूर, ब्राह्मणपुरी व ससदे या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. ग्रामपंचायतीच्या राखीव जागेवर उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांना सर्वच कागद अनिवार्य असून जातवैधता प्रमाणपत्र किंवा त्या कार्यालयात सादर केलेले कागदपत्रांचे टोकन हे नामनिर्देशन पत्र दाखल करताना अनिवार्य आहे.