लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : प्रकाशा, ता.शहादा हे आधीपासूनच उंच व सखल भागावर वसले आहे. त्यामुळे येथे खोदकाम करताना कधी मुर्त्या तर कधी पुरातन काळातील वस्तू निघत असतात. बुधवारी तर चक्क १७ व्या आणि १८ व्या शतकातील चांदीच्या शंभर नाणी निघाल्यात.याबाबत असे की, प्रकाशा गावाच्या पूर्व व दक्षिण दिशेला सद्य:स्थितीतही मातीचे डोंगर आहे. गावात घरांचे बांधकाम करत असताना जुने घर पाडल्यावर किंवा खोदकाम करताना कधी मूर्त्यातर कधी पुरातन काळातील वस्तू, नाणी निघतात. बुधवारी सोनार गल्लीतील शांताबाई कथ्थू मोरे यांचे जुने घर पाडून त्याठिकानी नवीन बांधकाम करण्यासाठी पायाचे खोदकाम करण्यात येत असातना अचानक एक मडके सापडले. त्यात सुरूवातीला कोळसे होते. मात्र हातात घेतल्यावर ते जड लागले तेव्हा त्यात पाहिले असता चक्क एक नाही, दोन नाही तर चक्क १०० चांदीच्या नाणी होत्या. चांदीचे नाणी भरलेला हा हंडा पाहताच खोदकाम करणारेदेखील चकित झाले. या वेळी ज्यांचे बांधकाम सुरू आहे ते आणि शांताबाई मोरे यांचे भाऊ तुकाराम मोरे, धिरज मोरेदेखील उपस्थित झाले. त्यांनी ही नाणी पाहिल्यावर लागलीच प्रकाशा पोलीस दूरक्षेत्रात सदर घटनेबाबत कळिवले. मात्र ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच गावातील व कानाकोपऱ्यातून पुरूष-महिला, युवकांनी नाणी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. याप्रसंगी पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी त्वरित दाखल झाले. त्यांनी सदर घटनेबाबत वरिष्ठांना कळवून पंचनामा केला. या वेळी शहादा तहसीलदार मिलींद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी मुकेश चव्हाण, तलाठी धर्मराज पाटील, ग्रामविकास अधिकारी बी.जी.पाटील, पोलीस गौतम बोराळे, पंकज जिरेमाळी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ही सर्व नाणी ताब्यात घेत महसूल विभागाकडे जमा केली.
प्रकाशा येथे उत्खननात सापडल्या पुरातन नाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 13:03 IST