रोज २० पेक्षा अधिक रुग्णांना घेऊन रुग्णवाहिकेची शहरात भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:38 IST2021-04-30T04:38:26+5:302021-04-30T04:38:26+5:30
नंदुरबार : शहरातील मोठ्या कोविड रुग्णालयांमध्ये बेड उपलब्धतेची असलेली समस्या लक्षात घेता रुग्णवाहिकांना रुग्णांना घेऊन एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात ...

रोज २० पेक्षा अधिक रुग्णांना घेऊन रुग्णवाहिकेची शहरात भटकंती
नंदुरबार : शहरातील मोठ्या कोविड रुग्णालयांमध्ये बेड उपलब्धतेची असलेली समस्या लक्षात घेता रुग्णवाहिकांना रुग्णांना घेऊन एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भटकंती करावी लागत असते. सध्या जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या वेबसाईटवर बेडच्या उपलब्धतेबाबत माहिती अपडेट केली जात असतानाही रुग्ण व त्यांचे नातेवाईक फिरफिर करीत असल्याचे चित्रही दिसून येत आहे.
नंदुरबार शहरात सात खासगी रुग्णालयांसह जिल्हा रुग्णालय तसेच तीन कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार केले जात असतात. यांपैकी खासगी रुग्णालयांकडे रुग्णांची धाव कायम आहे. जिल्हा रुग्णालयात कमी लक्षणे असलेले रुग्ण दाखल होत असले तरी अनेकांची खासगी रुग्णालयाकडे धाव असते. ही बाब लक्षात घेता रुग्णाला त्रास होऊ लागताच नातेवाईक रुग्णालयांमध्ये फिरफिर करून वेळ वाया घालवत असतात.
अशा वेळी रुग्णवाहिका एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात फिरत असते. त्याच वेळी एखाद्या रुग्णाला रुग्णवाहिकेची अतिशय निकड असते त्याचवेळी ही रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन एका दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यात फेऱ्या मारत असते. शहरात गेल्या महिनाभरापासून हे चित्र प्रकर्षाने दिसून येत आहे.