पोषण ट्रॅकर सक्तीचे केले असले तरी अंगणवाडी सेविकांना इंग्लिश येणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:30 IST2021-07-31T04:30:28+5:302021-07-31T04:30:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची माहिती भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर सक्तीचे ...

Although nutrition trackers are mandatory, Anganwadi workers must be able to speak English | पोषण ट्रॅकर सक्तीचे केले असले तरी अंगणवाडी सेविकांना इंग्लिश येणे आवश्यक

पोषण ट्रॅकर सक्तीचे केले असले तरी अंगणवाडी सेविकांना इंग्लिश येणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्क

तळोदा : जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची माहिती भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर सक्तीचे केले असले तरी ही माहिती भरण्यासाठी इंग्लिश येणे आवश्यक आहे. ७० टक्के सेविकांना या भाषेची मुख्य अडचण येत असल्याने त्यांना गावातील सुशिक्षितांचा आधार घ्यावा लागतो. एक तर सेविकांना इंग्लिश शिकविण्याची अथवा ही माहिती मराठीतून भरण्याचा पर्याय शासनाने द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सहा वर्षांच्या आतील बालकांबरोबरच गरोदर, स्तनदा माता व कुपोषित बालकांसाठी शासन अमृत आहार योजना राबवत आहे. या योजनेचा आहार गावातील अंगणवाड्यांमार्फत दिला जात असतो. या लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहाराची माहितीदेखील संकलित केली जात असते. ही माहिती पोषण ट्रॅकरमध्ये द्यावी लागते. त्यासाठी सेविकांना एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाकडून मोबाईलदेखील देण्यात आला आहे. शासनाने या ट्रॅकरमध्ये लाभार्थ्यांची माहिती भरण्यासाठी इंग्लिश भाषा सक्तीची केली आहे. परंतु नेमकी याच भाषेची अडचण निर्माण होत असल्याचे सेविकांनी सांगितले. वास्तविक जिल्ह्यातील एकूण अंगणवाडी सेविकांपैकी ७० टक्के सेविका या पुरेशा शिक्षणाअभावी इंग्लिशपासून लांब आहेत. त्यांना ही माहिती भरताना मोठी अडचण येत असते. अशावेळी या सेविका गावातील सुशिक्षित मुला-मुलींचा आधार घेत असतात. मात्र, हे काम परिपूर्ण करतात. प्रशासनाने सेविकांना प्रशिक्षण दिले असले तरी नाना अडचणींमुळे सातत्याने खोळंबा होत असतो. एकतर शासनाने सेविकांना इंग्लिश शिकविले पाहिजे अथवा ही माहिती मराठीमधून भरण्याचा पर्याय दिला पाहिजे, अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे.

पोषण ट्रॅकरवरील कामे

अंगणवाड्यांमध्ये दाखल झालेल्या सहा महिने ते सहा वर्षांआतील बालकांची वजन, उंची मोजणे, शिवाय गरोदर महिला, स्तनदा मातांचेही वजन, उंची मोजणे, त्यांना दिला जाणाऱ्या रोजच्या आहाराची नोंद ठेवणे, त्यांची रोजची हजेरी भरणे, त्यांच्या लसीकरणाची माहिती नोंदणे, शिवाय अंगणवाड्यांमधील पायाभूत सुविधांची नोंद ठेवणे आदी कामे अंगणवाडी सेविकांना करावी लागतात.

मोबाईलच्याही मोठ्या अडचणी

अंगणवाड्यांमधील लाभार्थ्यांची माहिती भरण्यासाठी शासनाने सेविकांना मोबाईल उपलब्ध करून दिला असला तरी मोबाईलमध्ये माहिती भरताना अनेक अडचणी येत असतात. त्यातही रेंजची मोठी समस्या आहे. कारण जिल्ह्यातील बहुसंख्य अंगणवाड्या अतिदुर्गम भागातील आहेत. तेथे कुठल्याच कंपनीची रेंज सेवा पुरेशी नाही. त्यामुळे ही माहिती भरताना सेविकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याची त्यांची व्यथा आहे. निदान शासनाने रेंजच्या कटकटीसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

शासनाने अंगणवाड्यांमधील लाभार्थ्यांच्या आहाराची माहिती भरण्यासाठी पोषण ट्रॅकरची सक्ती केली आहे. तीही इंग्लिशमध्ये भरावी लागत आहे. मात्र, पुरेशा इंग्लिशचे ज्ञान नसलेल्या आमच्यासारख्या सेविकांना मोठी अडचण येत असते. अशावेळी घरातील सुशिक्षितांचा आधार घ्यावा लागतो. निदान ही माहिती भरण्यासाठी मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करावा. - जेऊ वळवी, अंगणवाडी सेविका, अमलपाडा, ता. तळोदा.

लाभार्थ्यांची माहिती भरण्यासाठी शासनाने मोबाईल उपलब्ध करून दिले असले तरी दुर्गम भागात पुरेशा रेंजची मोठी समस्या येत असते. अशावेळी पोषण ट्रॅकरमध्ये माहिती भरताना खोळंबाच अधिक होतो. त्यामुळे रेजच्या समस्यांबाबत ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. - ललिता वळवी, सेविका, रेटपाडा, ता. तळोदा.

Web Title: Although nutrition trackers are mandatory, Anganwadi workers must be able to speak English

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.