नंदुरबार पालिकेत मर्जीतल्या मक्तेदाराला काम दिल्याचा आरोप, जिल्हाधिकाऱ्यांनी नेमली चौकशी समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:22 IST2021-05-31T04:22:38+5:302021-05-31T04:22:38+5:30
नंदुरबार नगरपालिका अंतर्गत विद्युत विभाग निविदा सूची क्र.४ सन २०२०-२१ व पाणीपुरवठा विभाग निविदा सूची क्र.५ सन २०२०-२१ या ...

नंदुरबार पालिकेत मर्जीतल्या मक्तेदाराला काम दिल्याचा आरोप, जिल्हाधिकाऱ्यांनी नेमली चौकशी समिती
नंदुरबार नगरपालिका अंतर्गत विद्युत विभाग निविदा सूची क्र.४ सन २०२०-२१ व पाणीपुरवठा विभाग निविदा सूची क्र.५ सन २०२०-२१ या दोन्ही निविदा प्रक्रियेत सहभागी मक्तेदारांकडून एक सारखीच कागदपत्रांची अपूर्णत: असताना पाणीपुरवठा निविदेतील मक्तेदारास अपूर्ण कागदपत्रे सादर करण्याचे कळवून पूर्तता करून घेण्यात आल्याचे भाजपच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. परंतु विद्युत विभागाने संबंधित ई-निविदेतील सहभागी मक्तेदारास कोणतीही कल्पना देण्यात आली नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याबाबत चौकशी करून नंदुरबार पालिकेचे मुख्याधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी शासकीय मक्तेदार गुलजार गिरासे यांनी केली होती. त्यानुसार १८ मार्च २०२१ रोजी चौकशी पथक नेमण्यात आले होते. परंतु पथक प्रमुख यांची बदली झाल्याने तसेच तक्रारदार याने केलेल्या २१ मे रोजीच्या विनंतीनुसार नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी पथकाची नेमणूक करत असल्याचे २४ मे रोजी काढलेल्या आदेशात म्हटले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
नंदुरबार उपविभागीय अधिकारी हे पथक प्रमुख असून, तहसीलदार आणि प्रशासन अधिकारी यांचा समावेश असलेली सदर त्रिसदस्यीय समिती चौकशी करेपर्यंत काम बंद राहणार आहे. १० दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. सदरच्या प्रसिद्धी पत्रकावर भाजपाचे नगरसेवक चारूदत्त कळवणकर, गौरव चौधरी, प्रशांत चौधरी, सिंधूबाई माळी, आनंद माळी, आकाश चौधरी, सुरेखा चौधरी, नीलेश पाडवी, संगीता वसईकर, संगीता सोनवणे, पृथ्वीराज जैन, कल्पना चौधरी यांच्या सह्या आहेत.
नंदुरबार पालिकेत सत्ताधारी मनमानी कारभार करीत असल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. गैरकारभाराने आपल्या ठेकेदार व कार्यकर्त्यांना पोसण्याचा हा प्रकार आहे. याबाबत सखोल चौकशी झाली पाहिजे व संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे.
-डॅा.रवींद्र चौधरी, भाजप नेते.