नवापुरात डांबरीकरणाचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:11 IST2021-02-05T08:11:17+5:302021-02-05T08:11:17+5:30
शहरातील गुजरगल्ली, शिवाजी रोड, कुंभारवाड्यातील नागरिकांनी रस्ता पाच ते सहा इंच खोदून नवीन व्यवस्थित डांबरीकरण करावे, अशी मागणी ...

नवापुरात डांबरीकरणाचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप
शहरातील गुजरगल्ली, शिवाजी रोड, कुंभारवाड्यातील नागरिकांनी रस्ता पाच ते सहा इंच खोदून नवीन व्यवस्थित डांबरीकरण करावे, अशी मागणी केली आहे. वर्षानुवर्षे रस्त्याचे काम करून जुनी घरे खोल गेल्यामुळे पावसाळ्यात घरात पाणी शिरत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. त्यांनी या कामाला विरोध केला आहे. यासंदर्भात स्थानिक नगरसेवक व नगराध्यक्षा यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व चांगल्या दर्जाचे डांबरीकरण केले जाईल, असे आश्वासन नागरिकांना दिले. या रस्त्याचे डांबरीकरण करणाऱ्या ठेकेदाराने शहरातील इतर रस्त्यांवर जास्त प्रमाणात डांबर टाकून चांगल्या दर्जाचे काम केल्याचाही दावा केलेला आहे व तसे व्हिडिओ त्यांनीही सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. दिवसभर नागरिक, ठेकेदार, पालिका प्रशासन, पदाधिकाऱ्यांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून आले. या भागातील काही दुकानदारांनी संध्याकाळी रस्त्यांवर नळीच्या साहाय्याने डांबरीकरणाचा कामावर पाणी मारण्याचा प्रताप केला.
नगर परिषदेच्या अंतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक सहा व सातमध्ये रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करण्यात येत आहे. नियमांना डावलून थातूरमातूर पद्धतीने रस्ता डांबरीकरणाचे काम होत असल्यामुळे हा निकृष्ट दर्जाचा रस्ता किती काळ तग धरणार, अशी तक्रार नागरिकांच्यावतीने करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामास कंत्राटदाराने रविवारपासून सुरुवात केली. नवनीत लोहार यांच्या घरापासून ते कुंभारवाड्यापर्यंत हा रस्ता अत्यंत वर्दळीचा व महत्त्वपूर्ण असल्यामुळे त्या रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने होणे आवश्यक होते. कंत्राटदारामार्फत अंदाजे ५६ लाख रुपयांची कामे होत असताना देखभालीकरिता पालिका प्रशासनाच्यावतीने एकही अधिकारी वा कर्मचारी उपस्थिती दर्शवत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. थातूरमातूर डांबर टाकून रस्ता कामास सुरुवात केली. डांबरीकरणाच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य असल्यामुळे अत्यंत वर्दळीचा हा रस्ता किती दिवस तग धरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक नगरसेवक व नागरिकांमध्येही शाब्दिक बोलचाल दिसून आली.
नवापूर शहरातील रस्ते दर्जेदार बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. शहरात चांगल्या पद्धतीने रस्त्यांचे काम केले जाणार आहे. दिलेल्या निविदेप्रमाणे ठेकेदाराकडून रस्त्याचे डांबरीकरणाचे काम नगरपालिका प्रशासन करीत आहे. नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे.
-हेमलता पाटील, नगराध्यक्षा, नवापूर
रस्त्याच्या डांबरीकरणाचे दोन वर्षापूर्वी मंजूर झालेले काम आहे. जुन्या निविदेप्रमाणे काम केले जात आहे. त्यात बदल करायचा असेल तर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करावी. नव्या पद्धतीने काम करणे आता शक्य नसून चांगल्या दर्जाचे काम केले जाईल. नागरिकांनी सहकार्य करावे. रस्त्यावरील माती काढूनच डांबरीकरण करण्यात येणार आहे. लगेच टाकलेले डांबर काढणार तर ते निघणारच आहे.
-आरिफ बलेसरिया, बांधकाम सभापती, नगरपालिका नवापूर
प्रभाग क्रमांक सहा व सातमधील रस्त्याच्या डांबरीकरणाचे श्रेय घेण्याचा अट्टहास सत्ताधारी काँग्रेस पार्टीने केला आहे. उद्घाटन झाल्यानंतर पुन्हा उद्घाटन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानंतर रस्त्याचे निकृष्ट काम केले जात आहे. नागरिकांनी विरोध केल्याने त्यासाठी स्थानिक नगरसेवक, नगराध्यक्षा मध्यस्थी करून रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी आग्रही आहे. खराब रस्त्याचे काम भारतीय जनता पार्टी होऊ देणार नाही, त्याचा आम्ही विरोध करू.
- एजाज शेख, भाजप पदाधिकारी, नवापूर