सर्व १७ रूग्ण बरे होवून घरी परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 12:12 IST2020-07-15T12:12:10+5:302020-07-15T12:12:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहरातील दामोदर नगरमधील शेवटचा कोरोना बाधित रूग्ण मंगळवारी दुपारी निगेटीव्ह आल्याने तो जिल्हा रूग्णालयातून ...

सर्व १७ रूग्ण बरे होवून घरी परतले
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : शहरातील दामोदर नगरमधील शेवटचा कोरोना बाधित रूग्ण मंगळवारी दुपारी निगेटीव्ह आल्याने तो जिल्हा रूग्णालयातून घरी परतल्याने वसाहतधारकांनी त्याचे पुष्पवृष्टीकरून स्वागत केले. शहरातील सर्व १७ रूग्ण या जीवघेण्या महामारीतून बरे झाल्याने तळोदा शहरदेखील कोरोनामुक्त झाले आहे. ते कायम कोरोनामुक्त राखण्यासाठी शहराबरोबरच ग्रामीण भागातील जनतेने प्रशासनाच्या नियमांचे अधीन राहून दक्ष राहण्याची गरज आहे.
कोरोना या जीवघेण्या महामारीचा शिरकाव आपल्या संपूर्ण देशात मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झाला होता. प्रत्यक्षात नंदुरबार जिल्ह्यात त्याची सुरूवात मे महिन्यापासून झाली होती. नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा या तिन्ही तालुक्यांमध्ये एकाच वेळी कोरोनाचे रूग्ण आढळून आले असताना तळोदा तालुका मात्र जूनच्या मध्यापर्यंत कोरोना निरंक होता. एवढेच नव्हे तर अक्कलकुव्यातील कोरोना बाधित प्राथमिक शिक्षिकेने शालेय पोषण आहाराच्या नियोजनाप्रसंगी शहरातील एका शाळेत आली होती. तेव्हा तिच्या संपर्कात तीन महिला आल्या होत्या. सुदैवाने त्यांचेही अहवाल निगेटीव्ह आले होते. साहजिकच जून महिन्यापर्यंत तळोदा शहराबरोबर संपूर्ण ग्रामीण भाग कोरोनापासून लांब होता. तथापि जूनच्या दुसºया आठवड्यात ठाणे कनेक्शन असलेल्या ७५ वर्षीय वृद्धेचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण तळोदा शहर खळबडून जागे झाले. त्या वेळी आरोग्य यंत्रणेने तिच्या मुलास आमलाड विलगीकरण कक्षात दाखल करून त्याचे स्वॅब जिल्हा रूग्णालयात पाठविले होते.
दोन दिवसांनी त्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर तेथूनच शहरात कोरोनाचा शिरकाव होण्यास सुरूवात झाली. त्यानंतर त्याच्या संपर्कातील सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. पाहता पाहता ही साखळी १४ रूग्णांपर्यंत गेली. साहजिकच आरोग्य यंत्रणेबरोबर पालिका व वरिष्ठ महसूल प्रशासन खडबडून जागे झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने मोठा माळीवाडा, खान्देश गल्ली, भोई गल्ली हे तीन परिसर कन्टेमेंट झोन घोषित करून तेथे ठोस उपाययोजना केल्या. पालिका व आरोग्य यंत्रणेने कायम कर्मचारी नियुक्त करून निर्जंतुकीकरण, नागरिकांची आरोग्य तपासणी केली होती. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यास प्रशासनास यश आले होते. शिवाय संसर्गही आटोक्यात आला होता. परंतु मीरा कॉलनीतल जोडप्याचा अंतयात्रेतील बाधितांशी संपर्क आल्यामुळे त्यांच्यासह शहरातील एक जण बाधित झाला होता. त्यामुळे मिरा कॉलनीतील काही भाग प्रशासनाने सील केला होता.
या सर्व बाधितांवर नंदुरबार जिल्हा रूग्णालयात ठोस उपचार करण्यात आल्यानंतर तेही बरे होऊ लागलेत. या सर्वांचा दुसरा वतिसरा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी पाठविण्यात आले. जसे जसे हे रूग्ण आपापल्या घरी परतु लागले तसे गल्ली, वसाहतीतील रहिवाशांनी त्यांचे पुष्पवृष्टीने स्वागत केले होते. त्यामुळे शहरवासीयांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. त्यातच शहरातील दामोदर नगरमधील शेवटचा रूग्ण मंगळवारी दुपारी नंदुरबार जिल्हा रूग्णालयातून घरी परतल्यामुळे तळोद्यातील सर्व १७ कोरोना बाधीत या रोगातून पूर्णपणे बरे झाले आहेत. परिणामी तळोदा शहरदेखील कोरोनामुक्त झाले आहे. या मागे तालुका आरोग्य यंत्रणा, पालिका व स्थानिक वरिष्ठ महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन या सर्वांनी अथक परिश्रम घेतले होते. त्यामुळे कोरोनाचा पाडाव करण्यात यश आले. साहजिकच नागरिकांनी त्यांचा सन्मान केला आहे. तथापि तळोदा शहराबरोबरच ग्रामीण भाग यापुढेही कोरोनामुक्त राखण्यासाठी नागरिकांनी सातत्याने दक्ष राहून प्रशासनास सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.
कोरोना महामारीचा राज्यात शिरकाव झाल्यानंतर अशा संशयित रूग्णांवर उपचार करण्यासाठी तालुका प्रशासनाने आमलाड येथील आदिवासी मुलांच्या वसतीगृहात स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आलाआहे. या कक्षात आतापावेतो साधारण १४ हजार जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. येथील आरोग्य यंत्रणेला त्यातील ८८ जणांमध्ये कोरोनाची लक्षणे अधिक प्रमाणात आढळून आल्यामुळे त्यांचे स्वॅब जिल्हा रूग्णालयात पाठविले होते. त्यापैकी १७ जण पॉझिटीव्ह आढळून आले होते. त्याचबरोबर २४२ जणांना संस्थात्मक क्वॉरंटाईनदेखील करण्यात आले होते. यात रशिया, कुवैत येथून फॉरेन रिटर्न आलेल्या दोन जनांचाही समावेश होता. सध्या आमलाड विलगीकरण कक्षात आता एकही संशयित उपचारासाठी नसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान गेल्या १३ ते १४ दिवसांपासूनदेखील शहर वा ग्रामीण भागातून कोरोना बाधित निघालेला नाही.