आला वासुदेव..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 13:08 IST2019-09-27T13:08:21+5:302019-09-27T13:08:27+5:30
मनाचा थांगपत्ता लागू देतील ते नेते कसले हो..! श्राद्ध पक्ष आणि राजकारणातील अनिश्चितता यामुळे वासुदेवही बुचकाळ्यात पडला आहे. गेल्या ...

आला वासुदेव..
मनाचा थांगपत्ता लागू देतील ते नेते कसले हो..!
श्राद्ध पक्ष आणि राजकारणातील अनिश्चितता यामुळे वासुदेवही बुचकाळ्यात पडला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून कानावर पडणा:या चर्चा, गप्पांमुळे संभ्रमावस्था कायम असल्याचे वासुदेवाच्या एकुण लक्षात आले. श्राद्धपक्ष संपल्यानंतर आणि एकदाची युतीचा निर्णय झाल्यानंतर जिल्ह्यात आणखी मोठय़ा घडामोडी होतील हे मनात ठरवून वासुदेव सकाळी दान मागण्यास निघाला. आज त्याने बाजारपेठेत न जाता दाटीवाटीच्या वस्तीत जावून दान मागण्याचे ठरविले. ठरल्याप्रमाणे आपल्या मुक्कामाच्या ठिकाणाहून बाहेर निघत तो एका चौकात आला. तेथ फक्कड चहा घेतल्यानंतर उत्साहात तो जवळच असलेल्या वस्तीत दान मागण्यासाठी घुसला. वस्ती दाटीवाटीची, त्यामुळे सकाळची धावपळ, महिलांची धुणी, भांडे उरकण्याची घाई सुरू होती. अशातच दान मागण्यासाठी त्याने आपल्या नेहमीच्या शैलीत सुरुवात केली. एक गिरकी घेत नाही तोच लहान मुलांचा गराडा त्याच्याभोवती पडला. गेल्या काही दिवसांपासून बाजारात माणसांचा गराडय़ाला कंटाळलेल्या वासुदेव बाळगोपाळांच्या गराडय़ात रमला.. काही घरे दान मागून वस्तीतील एका मंदीराजवळ आला. तेथे सात ते आठजण गप्पा मारत बसलेले होते. त्यांच्या हातात दोन ते तीन वर्तमान पत्र होते. त्यातील बातम्या वाचून त्यांची चर्चा रंगली होती. कानोसा घेण्यासाठी वासुदेव थकल्याचे सांगत तेथील ओटय़ावर बसला.. आणि गप्पा ऐकु लागला. पक्षांमधील इनकमींग आणि आऊटगोईंग श्राध्द पक्षामुळे थांबलेले असले तरी येत्या काळात अर्थात नवरात्रीत ते आणखी मोठय़ा प्रमाणावर होणार हे त्यातील एकजण सांगत होता. एकाने युती होणारच नाही. झालीच तर आपल्याच जिल्ह्यात तीनजण बंडखोरी करतील असा दावा केला. युती झाली नाही तर एकाच पक्षाकडून एकाच घरातील चारजण उभे राहतील असा दावा दुस:याने केला. त्यावर आणखीएकजण पुढे आला. हे तर काहीच नाही.. युती झाली तर आणखी काही तरी मोठे होणार आहे हे सांगून सर्वानाच डोके खाजविण्यास भाग पाडून गेला. वासुदेव हे सर्व लक्षपुर्वक ऐकत होता. त्या सर्वाच्या चर्चा वासुदेव ऐकत असल्याचे एकाने पाहिले आणि वासुदेवालाच प्रश्न केला. काय हो वासुदेवा.. काय चालू आहे. तुम्ही तर सर्वच भागात फिरता कुठे काय स्थिती, चर्चा आहे.. सांगाल काय.. वासुदेवाने जसे राजकारणातील काहीच माहिती नाही असा भाव चेह:यावर आणून आ... कुठे.. कुणाची स्थिती.. असे अडखळत बोलू लागला. काय सागांव दादा जिकडे जावे तिकडे सध्या राजकारणच ऐकायला येतेय. प्रत्येकजण आपला तर्क लावतोय. पण नेते काही त्यांच्या मनाचा आणि निर्णयाचा थांगपत्ता लागू देत नाही बघा.. चालू द्या तुमच्या चर्चा..मला दान मागायचं.. म्हणून वासुदेव उठला आणि पुढील घरात दान मागू लागला..
-वासुदेव