‘डाकीण’ प्रश्नावर अंनिस करणार आक्रमक प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 12:02 IST2019-02-23T12:02:23+5:302019-02-23T12:02:55+5:30
वडफळीला भेट : ‘डाकीण प्रथाविरोधी युवा एल्गार’ मोहीम राबविणार

‘डाकीण’ प्रश्नावर अंनिस करणार आक्रमक प्रबोधन
कोठार : डाकीणीच्या संशयावरून धडगाव तालुक्यातील वडफळ्या येथील खून करण्यात आलेल्या महिलेच्या कुटुंबीयांची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेत घडलेला प्रकार जाणून घेतला. दरम्यान, आगामी काळात जिल्ह्यात डाकीण प्रश्नावर अंनिसकडून आक्रमक प्रबोधन केले जाणार असून त्यासाठी ‘डाकीण प्रथाविरोधी युवा एल्गार’ मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली.
नात्याने दीर असलेल्या सुकलाल पावराने आपल्याच भावजयीचा डाकीण ठरवून खून केल्याची घटना नुकतीच धडगाव तालुक्यातील वडफळ्या या गावात घडली. आरोपी सुकलाल पावरा याने पोलीस जबाबात डाकिणीच्या संशयावरून महिलेचा खून केल्याचे कबूल केले असून जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत धडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ दिवसांपूर्वीही अक्कलकुवा तालुक्यातील उमरकुवा येथील महिलेला डाकीण ठरवून करण्यात आलेल्या बेदम मारहाणीत तिचा हात मोडला होता. या प्रकरणातही महाराष्ट्र अंनिसच्या पाठपुराव्याने आरोपींवर जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डाकीण ठरवून निर्घृण खून झाल्याच्या घटनेतील कारवाईचा पाठपुरावा महाराष्ट्र अंनिसकडून केला जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राज्य सरचिटणीस विनायक सावळे, नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.केशव पावरा व इतर कार्यकर्त्यांनी खून झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. खून झालेल्या महिलेला डाकीण ठरविण्याचे काय कारण होते? डाकीण कसे ठरविण्यात आले? त्याआधीचे संबंध कसे होते? डाकीण ठरविण्यासाठी काय प्रक्रिया केली गेली? याचा तपशील घेण्यात आला. त्यावेळी कुटुंबीयांकडून व्यक्त झालेल्या अपेक्षा आणि त्यांनी सांगितलेल्या तपशिलांच्या आधारावर महाराष्ट्र अंनिसच्या शिष्टमंडळाने धडगाव पोलीस स्टेशनलाही भेट दिली. डाकीण ठरवून खून झालेल्या घटनेतील पोलीस तपास अधिकारी एस.व्ही. दहिफळे यांच्याशी चर्चा करण्यात आली. तपास अधिकाऱ्यांना कुटुंबीयांशी झालेल्या संवादातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि घटनाक्रमाच्या मूल्यमापनातून काही निरीक्षणे आणि मागण्या महाराष्ट्र अंनिसच्या वतीने नोंदवण्यात आल्या आहेत.
डाकीण ठरविण्यासाठी गावातील ५० पेक्षा जास्त लोकांना घेऊन आरोपी धडगाव तालुक्यातील मांडवीजवळील निगदी येथील मांत्रिकाकडे गेलेला होता. सदर मांत्रिकाच्या सल्ल्याने डाकीण ठरवून खून झालेला आहे. त्यामुळे मांत्रिकालादेखील सहआरोपी करावे तसेच आदिवासी समाजात डाकीण ठरवलेल्या महिलेच्या कुटुंबातील इतर महिलांनाही डाकीण असण्याच्या संशयाला व आरोपाला सामोरे जावे लागते. त्यामुळे खून झालेल्या महिलेच्या तीन मुलींच्या आणि सुनेच्या मनामध्ये आपल्यालाही डाकीण ठरविले जाईल याबाबत प्रचंड भीती जाणवली व ती त्यांनी बोलूनदेखील दाखवली. त्यामुळे या सर्व महिलांना त्यांच्या गावात संरक्षण देण्याची गरज आहे. यासाठी संबंधित गावातील पोलीस पाटलांना जबाबदार धरले जाणे आवश्यक आहे, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसकडून करण्यात आली आहे.
यापुढील काळात अधिक आक्रमक प्रबोधनाने डाकीण प्रश्न हाताळण्याची आवश्यकता असल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले. त्यासाठी शासन, प्रशासनासह आदिवासी समाजातील शिक्षित वर्ग आणि युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामध्ये आरोग्य व शिक्षण विभागातील यंत्रणांच्या मदतीने आदिवासी समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन व सारासार विचार करण्याची पद्धती विकसित करायला प्राधान्य देवून प्रामुख्याने धडगाव, अक्कलकुवा या तालुक्यातील शैक्षणिक संस्था आणि शासकीय यंत्रणा यांच्यासोबत नियोजनबद्धरीत्या ‘डाकीण प्रथाविरोधी युवा एल्गार’ प्रबोधन मोहीम अंनिसकडून राबवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.