कारवाई करण्याच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 10:41 IST2020-12-19T10:41:13+5:302020-12-19T10:41:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर येत्या आठ दिवसात कारवाई करण्यात येईल, ...

कारवाई करण्याच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर येत्या आठ दिवसात कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी उपोषणकर्त्यांना दिल्यानंतर चार दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची शुक्रवारी सांगता झाली.
तालुक्यातील मामाचे मोहिदे येथील विकास पिंपळे या युवकाला १९ नोव्हेंबरला पोलीस ठाण्यात पोलिसांनी मारहाण केली होती. संबंधितांवर कारवाई करण्यात यावी यासाठी प्रांताधिकारी कार्यालयाजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पिंपळे कुटुंब बेमुदत उपोषण करीत होते. शुक्रवारी सकाळी आमदार राजेश पाडवी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर दुपारी आमदार संपर्क कार्यालयात उपोषणकर्त्यांचे प्रतिनिधी, पोलीस दलातील अधिकारी, महसूल विभागातील अधिकारी यांची आमदार पाडवी यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत समाधानकारक तोडगा निघाल्यानंतर पोलीस प्रशासनातर्फे उपोषणकर्त्यांना कारवाईचे पत्र देण्यात आल्यानंतर उपोषणाची सांगता झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी उपोषणकर्त्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पिंपळे कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारी अर्जाची चौकशी नंदुरबार येथील उपविभागीय पोलीस अधिकारी करीत असून या चौकशीदरम्यान पो.कॉ.सचिन पाटील व रवींद्र सैंदाणे यांना १७ डिसेंबरपासून नंदुरबार पोलीस मुख्यालयात संलग्न करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे उपनिरीक्षक कैलास माळी हे प्रशिक्षणासाठी धुळे येथे उपस्थित आहेत. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर चौकशी अहवालाच्या अनुषंगाने संबंधितांवर येत्या आठ दिवसात योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी लेखी पत्रासोबत लिंबूपाणी देऊन पिंपळे कुटुंबियांच्या उपोषणाची सांगता केली. यावेळी विविध पक्षाचे व संघटनांचे प्रतिनिधी, मोहिदा येथील ग्रामस्थ उपस्थित होते. उपोषणाची सांगता झाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.