चार दिवसांच्या लॉकडाऊननंतर बाजारपेठेत उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:29 IST2021-04-13T04:29:09+5:302021-04-13T04:29:09+5:30

नंदुरबार : येथे चार दिवसांच्या लॉकडाऊननंतर सोमवारी सकाळी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी उसळली होती. मुख्य बाजारपेठेसोबतच उपबाजार असलेला भागही माणसांच्या ...

After four days of lockdown, the market was crowded | चार दिवसांच्या लॉकडाऊननंतर बाजारपेठेत उसळली गर्दी

चार दिवसांच्या लॉकडाऊननंतर बाजारपेठेत उसळली गर्दी

नंदुरबार : येथे चार दिवसांच्या लॉकडाऊननंतर सोमवारी सकाळी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी उसळली होती. मुख्य बाजारपेठेसोबतच उपबाजार असलेला भागही माणसांच्या गर्दीने व्यापला होता. यात सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे स्पष्टपणे दिसले. दरम्यान, मंगळवारी गुढीपाडवा असल्याने त्याच्या खरेदीसाठीही बाजारात गर्दी मावत नव्हती.

नंदुरबार येथे १ ते १५ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन अर्थात जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. यात सोमवार, मंगळवार व बुधवार असे तीन दिवस सकाळी सात ते दुपारी एकपर्यंत अत्यावश्यक सेवेसोबत भाजीपाल्याला परवानगी देण्यात आली आहे. गुरुवार ते रविवार असे चार दिवस कडकडीत बंद राहिल्यानंतर आज सकाळी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी उसळली होती.

जिल्ह्यात आधीच लॉकडाऊन

एकीकडे राज्यात कडकडीत लॉकडाऊन लावण्याची तयारी सुरू आहे. त्यातच नंदुरबार जिल्ह्यात आधीच लॉकडाऊन आहे. यामुळे सर्वसामान्यांसह सर्वच घटकांनी सोमवारी सकाळी बाजारपेठ उघडताच खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.

जिकडे नजर टाकावी तेथे गर्दी

शहरातील मुख्य बाजारपेठेसोबतच परिसरातही गर्दी उसळली होती. स्टेशन रोड, नगरपालिकेचे जुने कार्यालय चौकात भाजीपाल्याची तात्पुरती दुकाने थाटण्यात आली आहेत. यासोबतच सुभाष चौक ते अंधारे चौक, कपडा बाजार ते धान्य बाजार, धुळे रस्त्यावरील मोठा मारुती चौक ते स्टेट बँकेपर्यंत भाजीपाला विक्रेते विक्रीसाठी बसलेले होते. यासोबतच सिंधी कॉलनीत गर्दी होती. तालुका क्रीडा संकुलाच्या मोकळ्या जागेतही भाजीपाला विक्रीसाठी आलेला होता.

सामाजिक अंतराचे विसरले भान

बाजारात चौफेर गर्दी होती. काही ठिकाणी तर सामाजिक अंतराचे भान नागरिक विसरले की काय, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र सकाळी पाहायला मिळाले.

पोलिसांचीही कारवाई

एकीकडे खरेदीसाठी बाजारात गर्दी उसळलेली असताना दुसरीकडे कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसत होते. अनेक नागरिकांच्या तोंडावर मास्क नव्हते. अशा काही नागरिकांवर पोलीस कारवाई करीत होते. यात रोख २०० रुपये दंड किंवा जागेवरच दंड न भरल्यास ऑनलाईन रक्कम भरण्याविषयी पोलीस कर्मचारी संबंधितांना सूचित करीत होते.

Web Title: After four days of lockdown, the market was crowded