After the father and grandmother, now the smoke of nationalism has come to the grandson | वडील, आजी नंतर आता नातूकडे आली राष्ट्रवादीची धूरा

वडील, आजी नंतर आता नातूकडे आली राष्ट्रवादीची धूरा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या वर्षभरापासून अध्यक्षाविना असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला अखेर डॉ.अभिजीत मोरे यांच्या रुपाने अध्यक्ष मिळाले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी, मुंबई येथे पक्ष कार्यालयात डॉ.मोरे यांना नियुक्तीचे पत्र दिले. डॉ.मोरे यांचे वडिल हे पक्षाचे पहिले जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्या आजी दहा वर्ष जिल्हाध्यक्षा होत्या. आता त्यांच्याकडे हे पद आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाबाबत प्रचंड रस्सीखेच होती. पक्ष निरिक्षक आले असता त्यांना दोन मेळावे घ्यावे लागले होते. त्यामुळे कुठल्या गटाला अध्यक्षपद मिळते याकडे लक्ष लागून होते. परंतु पक्ष अडचणीत असतांना आणि जिल्हा परिषद निवडणुकीत नेतृत्वहिन असतांना डॉ.अभिजीत मोरे यांनी कुठलेही पद नसतांना पक्षाला सांभाळले. कार्यकर्ते आणि उमेदवारांमध्ये चैतन्य निर्माण केले. त्यामुळे अनेक गटात पक्षाने प्रस्थापित उमेदवारांना चांगली टक्कर दिली. गेल्या वर्षभरापासून पदाची अपेक्षा न बाळगता मोरे यांनी पक्ष कार्य सुरू ठेवले होते.
त्यांच्या या कार्याची दखल अखेर पक्षाला घ्यावी लागली. मुंबई येथे बुधवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले. त्यांच्या निवडीमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, त्यांचे वडिल कै.दिलीप मोरे यांनी जिल्ह्यात पक्षाची बांधणी केली होती. ते पहिले जिल्हाध्यक्ष होते. त्यांनी पक्ष संघटन वाढविण्यात मोठे योगदान दिले होते. त्यानंतर त्यांच्या आजी कै.कमलाताई मराठे यांच्याकडे हे पद आले. त्यांनी देखील १० वर्षापेक्षा अधीक काळ पक्षाची धुरा सांभाळून पक्ष गाव, पाड्यापर्यंत नेला. याच काळात डॉ.अभिजीत मोरे यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धूरा होती ती त्यांनी समर्थपणे सांभाळली होती.
आता पुन्हा त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा आली आहे. पक्ष संघटन वाढविणे, कार्यकर्त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देणे, तळागाळातील लोकांची कामे करणे व येत्या काळात दोन आमदार निवडून आणणे हे आपले ध्येय असल्याचे डॉ.अभिजीत मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.

 

Web Title: After the father and grandmother, now the smoke of nationalism has come to the grandson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.