स्वतंत्र कोविड कक्षासाठी प्रशासनाचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 12:10 IST2020-07-07T12:10:17+5:302020-07-07T12:10:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉक डाऊनच्या दुसऱ्या दिवशी शहरासह तालुक्यातील लोणखेडा, ...

स्वतंत्र कोविड कक्षासाठी प्रशासनाचे प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉक डाऊनच्या दुसऱ्या दिवशी शहरासह तालुक्यातील लोणखेडा, तोरखेडा, दामळदा, म्हसावद व डामरखेडा या गावांमध्ये सर्व व्यवहार बंद ठेवत नागरिकांनी समर्थन दिले. प्रशासनातर्फे बाधीत रूग्णांच्या संपर्कातील नागरिकांची माहिती जाणून घेतली जात असून संशयितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येत आहे. शहादा येथे स्वतंत्र कोविड कक्ष सुरू करण्याचे प्रयत्न प्रशासनातर्फे करण्यात येत असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी दिली.
३ जुलैला शहरात आठ व ५ जुलैला तालुक्यातील तोरखेडा येथे पाच असे सलग १३ कोरोना विषाणू बाधीत रुग्ण आढळून आल्याने प्रशासन हायअलर्टवर आहे. वाढत्या रूग्णसंख्येला आळा घालण्यासाठी प्रशासनातर्फे ८ जुलैपर्यंत शहादा व लोणखेडा या गावात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. प्रतिबंध क्षेत्रातील भागात निर्जंतुकीकरण करण्यासह रहिवाशांची वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणी केली जात आहे. बाधीत रुग्णांची प्रवास व इतर माहिती जाणून घेतली जात असून अतिसंपर्कातील व्यक्तींची विलगीकरण कक्षात रवानगी केली जात आहे. तर संपर्कातील व्यक्तींना घरी राहण्याचा सल्ला आरोग्य विभागामार्फत दिला जात आहे.
तालुक्यातील हिंगणी, बामखेडा व तोरखेडा या भागात कोरोना विषाणू बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. विशेषत: तोरखेडा येथील रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब झाली आहे. हा संपूर्ण भाग धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुकानजीक असल्याने व शिरपूर हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असल्याने या संपूर्ण परिसरात विशेष काळजी प्रशासनाने घ्यायला हवी. विशेषत: शहादा तालुक्यातील अनेक नागरिक व्यवसाय व कामानिमित्त शिरपूर येथे जातात. बाधीत रुग्णांची प्रवास हिस्ट्री ही शिरपूर असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. परिणामी आंतरजिल्हा प्रवासाला परवानगीशिवाय बंदी असतानाही या परिसरातील नागरिक शिरपूर येथे पोहोचतात कसे व शिरपूर येथील नागरिक शहादा तालुक्यात येतात कसे? याबाबत प्रशासनाने विशेष चौकशी करण्याची गरज आहे.सारंगखेडा पोलिसांचे शहादा हद्द समाप्तीवर तपासणी पथक आहे. असे असतानाही शहादा-शिरपूर प्रवास कसा काय सुरु आहे याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे.
शहरासह तालुक्यातील अनेक भागात कोरोना विषाणू संक्रमणाचे लक्षणे दिसून येत नसली तरी बाधीत रुग्णांबाबतचा अहवाल मिळाल्यानंतर त्याच्या संपर्कातील नातेवाईक व नागरिकांचा कोरोना विषाणू अहवाल पॉझिटीव्ह येत असल्याने शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. प्रशासनातर्फे बाधीत रुग्ण आढळून आल्यानंतर त्या भागातील रुग्णाच्या अतिसंपर्कातील व्यक्तींना मोहिदा येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येऊन तेथे त्यांच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत. या नमुन्यांचा अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत अशा नागरिकांना विलगीकरण कक्षातच ठेवले जात होते. मात्र ज्या नागरिकांना कोरोनाची कुठलीही लक्षणे आढळत नाही परंतु यातील काहींचा अहवाल पॉझिटीव्ह येत असल्याने अशा नागरिकांना व लक्षणे आढळून येत नसलेल्या रुग्णांसाठी लवकरच शहादा येथे स्वतंत्र इमारतीत आयसोलेशन वार्ड कार्यान्वित करण्याबाबत प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी दिली.
दरम्यान, सोमवारी पाच जणांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून ३६ जणांना मोहिदा रस्त्यावरील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
गणेशनगर येथील दोन बाधीत बाधित रुग्णांचा उपचाराचा अंतिम अहवाल आल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयात शहरासह तालुक्यातील १४ बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आजआखेर शहरासह तालुक्यातील ५४ जणांचा अहवाल अपेक्षित आहे.
तोरखेडा, दामळदा व डामरखेडा गाव चार दिवस बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायतींनी घेतला आहे.
तोरखेडा येथील बाधीत पाच रुग्ण १० दिवसापासून मोहिदा रस्त्यावरील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.