नवापूर येथील शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST2021-03-19T04:29:17+5:302021-03-19T04:29:17+5:30
नवापूर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नवापूर तालुका मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नवापूरचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन दिले. ...

नवापूर येथील शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय
नवापूर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नवापूर तालुका मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नवापूरचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात पहिली ते बारावीचे वर्ग नियमित सुरू आहेत; परंतु कोरोनाचा दुसरा फेरा वाढत असून, दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शाळेत येणारा विद्यार्थी हा विविध भागातून येत असून, शाळेत सर्व नियमांचे पालन करूनदेखील पॉझिटिव्ह विद्यार्थी व शिक्षक असण्याचे प्रमाण वाढतच आहे. तीन दिवस शालेय कामकाज बंद ठेवूनही नंतर पॉझिटिव्ह आढळल्याचे प्रमाण दिसत आहे, त्यामुळे शिक्षक, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होत आहे. या आशयाचे निवेदन तहसीलदार कुलकर्णी यांना देण्यात आले. सार्वजनिक मराठी हायस्कूल प्राचार्य तथा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मिलिंद वाघ, एनडीएमवाय सार्वजनिक हायस्कूलचे प्राचार्य तथा कोषाध्यक्ष प्राचार्य संजय जाधव, सदस्य तथा मुख्याध्यापक डी.एम. बिरारीस, शिवाजी हायस्कूलचे प्रतिनिधी हरीश पाटील, वनिता विद्यालयाचे प्रतिनिधी चंद्रशेखर बेंद्रे, पाटील, नॅशनल उर्दू हायस्कूल प्रतिनिधी, वनवासी उत्कर्ष समितीचे प्रतिनिधी व सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीने निवेदन देण्यात आले.
त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी नवापूर शहरातील सर्व पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग, निवासी शाळा, वसतिगृहे, खासगी कोचिंग क्लासेस ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.