प्रशासन पोहचणार तालुक्याच्या ठिकाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 11:59 IST2019-05-14T11:59:13+5:302019-05-14T11:59:36+5:30

समन्वय साधणार : जून महिन्यापासून होणार अंमलबजावणी

Administration will reach at taluka level | प्रशासन पोहचणार तालुक्याच्या ठिकाणी

प्रशासन पोहचणार तालुक्याच्या ठिकाणी

नंदुरबार : प्रशासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या कालमर्यादेत सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी आठवड्यातील एक दिवस तालुका स्तरावर जाऊन कामकाज पाहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर प्रशासकीय कामकाजाला वेग देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. आठवड्यातील एक दिवस जिल्हास्तरीय अधिकारी तालुका मुख्यालयाला उपस्थित राहतील. स्वत: जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारीदेखील तालुका मुख्यालयी आढावा घेतील. तालुकाभेटीची सुरुवात क्षेत्रभेटीने होईल. यावेळी शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती घेण्यात येईल. नागरिकांना शासकीय सुविधांची माहितीदेखील यावेळी देण्यात येईल. योजनेच्या क्रियान्वयनात समस्या असल्यास विविध यंत्रणांच्या समन्वयाने त्याच ठिकाणी सोडविण्यात येतील. स्वत: जिल्हाधिकारी बैठकीपूर्वी तालुक्यातील निवडक गावांना पूर्वसूचना न देता भेट देतील व तेथील विकासकामांची माहिती घेतील. ते नागरिकांशीदेखील संवाद साधतील. यानंतर होणाऱ्या आढावा बैठकीत सकारात्मक दृष्टिकोनातून समस्या सोडविण्याबाबत चर्चा करून त्याच ठिकाणी निर्णय घेण्यात येतील. तसेच क्षेत्रभेटीत दिसलेल्या त्रुटी आणि नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येईल. सर्व वरिष्ठ अधिकारी एकाच ठिकाणी असल्याने तालुका किंवा गावपातळीवरील विकासविषयक अडचणी कमी कालावधीत दूर करणे शक्य होणार आहे. शिवाय अधिकाऱ्यांचा नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद झाल्याने त्यांच्या वास्तविक गरजा आणि शासनाच्या योजना यांची सांगड घालून विकासाचे योग्य नियोजन करणे शक्य होणार आहे. विकासकामांमध्ये येणाºया अडथळ्यांची माहितीदेखील यानिमित्ताने मिळणार असल्याने विकासाचे सु्क्ष्म नियोजन करता येईल. जिल्ह्यात प्रथमच असा उपक्रम राबवून प्रशासन लोकाभिमुख करण्याचा मनोदय मंजुळे यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Administration will reach at taluka level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.