‘त्या’ विद्यार्थ्यांबाबत प्रशासन अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 11:26 IST2020-05-11T11:26:36+5:302020-05-11T11:26:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवाहून बिहारला गेलेले तीन विद्यार्थी कोरोनाबाधीत असल्याचे अहवाल सहरसा (बिहार) येथील प्रशासनाला प्राप्त झाले. ...

‘त्या’ विद्यार्थ्यांबाबत प्रशासन अनभिज्ञ
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवाहून बिहारला गेलेले तीन विद्यार्थी कोरोनाबाधीत असल्याचे अहवाल सहरसा (बिहार) येथील प्रशासनाला प्राप्त झाले. दरम्यान, जामिया इन्स्टीट्यूटने आमच्याकडून योग्य ती तपासणी झाल्याचा दावा करून इतर अफवा निराधार असल्याचे म्हटले आहे.
चार दिवसांपूर्वी विशेष रेल्वेने अक्कलकुवा येथील अनेक विद्यार्थी तसेच उत्तर भारतीय नागरिकांना नंदुरबारहून रवाना करण्यात आले होते. त्यापूर्वी या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी झाल्याचे सांगितले गेले होते. तरीही बिहारमध्ये जाताच या विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह कसा आला याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाला याबाबत मात्र माहिती नसल्याचे सांगण्यात आले. रेल्वेने गेलेल्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी रेल्वे स्थानकात लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते. या तीन विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली याचाही शोध घेणे आवश्यक आहे.
नंदुरबारहून गेलेले विद्यार्थी बिहारमध्ये कोरोना पॉझिटिव्ह निघत असतील ती बाब गंभीर मानावी लागणार आहे. नंदुरबार ते सहरसा हा दोन दिवसांचा प्रवास होता. या प्रवासात विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगसाठी सुचना देण्यात आल्या होत्या. तशी बैठक व्यवस्था देखील होती. सहरसाचे जिल्हाधिकारी कौशल कुमार यांनी १३ वर्षीय दोन तर १८ वर्षीय एक विद्यार्थी असल्याचे सांगितले आहे. या विद्यार्थ्यांच्या सोबत इतर विद्यार्थ्यांचेही स्वॅब घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता स्थानिक स्तरावरच्या एकुणच तपासणीबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, जामिया इस्लामिया इशातूल उलूम संस्थेने विद्यार्थ्यांची योग्य काळजी घेतली. वेळोवेळी शासकीय वैद्यकीय तपासणी केल्याचे म्हटले आहे. उठणाऱ्या वावड्या व अफवा निराधार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.