प्रशासनाने दुरसंचारचे टोचले कान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:07 IST2019-11-25T11:07:23+5:302019-11-25T11:07:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गम भागातील बीएसएनएलच्या अनियमित सेवेला नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यांनी थेट टॉवरचीच होळी करण्याचा ...

प्रशासनाने दुरसंचारचे टोचले कान
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुर्गम भागातील बीएसएनएलच्या अनियमित सेवेला नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यांनी थेट टॉवरचीच होळी करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. त्याची दखल घेत अक्कलकुवा तहसिलदारांनी दूरसंचार विभागाला पत्राद्वारे नियमित सेवेसाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहे. शिवाय उपाययोजनेचा अहवाल देण्याचेही बजावले आहे.
मोलगी परिसरातील ग्राहकांच्या सुविधेसाठी दूरसंचारमार्फत मोलगी, जमाना, सरी व वेली तर धडगाव तालुक्यात खुंटामोडी, सुरवाणी, कात्री, सिसा या ठिकाणी उभारण्यात आलेले टॉवर वारंवार बंद पडतात. या खंडीत सेवेमुळे संपर्काच्या अडचणी निर्माण झाल्या आहे. तर सद्यस्थितीत शासनामार्फत करण्यात आलेली शासकीय व खाजगी ऑनलाईन कामेही वेळेवर पूर्ण होत नाही. तेथील ऑनलाईन सेवा सर्वस्वी बीएसएनएलवर आधारित आहे. त्यामुळे सर्व ऑनलाईन कामेही याच नेटकर्ववर आधारित आहे. परंतु अशा खंडीत व अविश्वसनीय सेवेमुळे सर्वसामान्य नागरिकांसह प्रशासनाची ऑनलाईन कामे रखडत आहे.
वारंवार खंडीत होणारी सेवा दुरुस्त व्हावी म्हणून वारंवार पाठपुरावा करण्यात आला, परंतु त्याची दुरसंचारने दखलच घेतली नाही. त्यामुळे त्या भागातील टॉवरची होळी करण्याचा इशारा ग्राहकांनी दिला. याबाबत दुरसंचार विभागाकडून कुठल्याही हालचाली होतांना दिसत नाही. असे असतानाच दुरसंचार विभागाला अक्कलकुवा तहसिलदारांमार्फत पत्र देण्यात आले आहे. त्यात प्रशासनांमार्फत मोलगी भागातील चारही अनियमित सेवा देणा:या टॉवरसह डाब, काठी व भगदरी येथे टॉवर उभारण्यासाठी खोदलेल्या खड्डय़ांचाही उल्लेख करण्यात आला आहे. शिवाय ऑनलाईनची प्रशासकीय कामे व 108 रुग्णवाहिका या सुविधांपासूनही नागरिकांना वंचित राहावे लागत असल्याचे नमुद केले आहे.
प्रशासनामार्फत पत्र देण्यात आले असतानाही दुरसंचार विभागामार्फत अपेक्षीत हालचाली सुरू झाल्या नसल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांच्या आंदोलनात मालमत्तेचे नुकसान झाले अथवा कुठलाही प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी दुरसंचार विभागच जबाबदार राहणार असल्याचे पत्रात तहसिलदारांमार्फत नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे दूरसंचार विभागामार्फत कुठली भूमिका घेतली जाते याकडे मोलगी भागातील बीएसएनएलच्या ग्राहकांचे लक्ष लागून आहे.