शहादा तालुक्यात गुटखा तस्करीवर पायबंद घालण्यात प्रशासन अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:30 IST2021-04-21T04:30:25+5:302021-04-21T04:30:25+5:30
शासनाने राज्यात गुटखा उत्पादन व विक्री वर बंदी घातलेली असताना गुटख्याची तस्करी सुरू आहे म्हणून गुटखा तस्करांचे मोठे जाळे ...

शहादा तालुक्यात गुटखा तस्करीवर पायबंद घालण्यात प्रशासन अपयशी
शासनाने राज्यात गुटखा उत्पादन व विक्री वर बंदी घातलेली असताना गुटख्याची तस्करी सुरू आहे म्हणून गुटखा तस्करांचे मोठे जाळे सर्वत्र पसरले आहे. अनेक ठिकाणी अवैध मार्गाने गुदामात लाखो रुपयांचा माल साठवून ठेवण्यात आला आहे. शहरातील किराणा दुकानदार व पानटपरीचालकांकडून गुटखा विक्रीचे सूत्र हलविली जातात. मध्यंतरीच्या काळात गुटखा तस्करांत आपसातील हेवेदावे निर्माण झाल्याने आरोपीसह माल पकडून देण्यात आला. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी माल वाहतूक होताना गाडीसह लाखो रुपयांचा माल पकडून गुन्हा दाखल केला आहे. अनेकदा अशी कारवाई करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. नागरिकांनी छुप्या मार्गाने दुचाकीवरून गुटखा वाहतूक करताना पकडला आहे. असा सावळा गोंधळ शहर व तालुक्यात सुरू आहे.
गेल्या वर्षभराच्या कालावधीत शहादा तालुक्यातील शहादा, म्हसावद व सारंगखेडा पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तिन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीत किमान दहा गुटखा तस्करीच्या कारवाया केल्या. या कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा वाहनासह जप्त केला, मात्र केवळ वाहनचालक व गाडीतील त्याचा साथीदार अशा दोघांना याप्रकरणी पोलिसांनी आरोपी केले आहे. विशेष म्हणजे संबंधित वाहनचालकाने कोणाच्या सांगण्यावरून व कुठून हा गुटखा आणला याचा तपास लावणे पोलिसांना सहजरीत्या शक्य असतानाही पोलीस तपासात या कारवायांमध्ये आरोपींची संख्या वाढलेली नाही. परिणामी गुटका विक्रेता व तस्कर व त्यांचे इतर साथीदार पोलीस कारवाईपासून लांबच राहिले. यामुळे तस्करांवर कायद्याचा धाक नसल्याने तालुक्यात गुटख्याची तस्करी व विक्री खुलेआमपणे होत आहे.
राज्यात गुटख्याची विक्री व वाहतुकीची बंदी असली तरी शहादा तालुका हा गुजरात व मध्य प्रदेश या दोन राज्यांना सीमावर्ती भागात असल्याने या दोन्ही राज्यांतून मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी करून शहर व तालुक्यात त्याची विक्री केली जात आहे. मध्यंतरी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातील गुटखा तस्करीबाबत तक्रारी केल्या, मात्र त्यानंतर तस्करी बंद होण्याऐवजी दिवसेंदिवस फोफावत असल्याने या गुटखा तस्करांवर अभय व आशीर्वाद कोणाचा याचा शोध आता पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेण्याची गरज आहे.