Address the issues before the MLAs | आमदारांसमोर समस्यांचा पाढा
आमदारांसमोर समस्यांचा पाढा


लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाणीटंचाई बरोबरच अस्वच्छता, सिटी स्कॅन, रक्ताचा रिपोर्ट अशा वेगवेगळ्या समस्यां रूग्णांनी प्रत्यक्ष आमदारांपुढे मांडल्या. दरम्यान, आमदार राजेश पाडवी यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न ऐकूण या प्रकरणी पुढील कार्यवाही करण्यासाठी तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनास दिल्या आहेत.
राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत तळोदा येथे केंद्र शासनाने उपजिल्हा रुग्णालय स्थापन केले आहे. साहजिकच रुग्णांना पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा होती. परंतु सुविधांपेक्षा रुग्णांना येथे असुविधांचाच अधिक सामना करावा लागत आहे. उपजिल्हा रुग्णालय असतांना तेथे सिटी स्कॅन, सोनोग्राफी, रक्त चाचणी, अशा महत्वाच्या सुविधा नाहीत. त्यामुळे रुग्णांना खाजगी अथवा नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात जावे लागत असते. तसेच या तपासणींसाठी प्रचंड पैसा खर्च करावा लागत असतो. विशेष म्हणजे रुग्णालयात साधे पुरेशे पाणीदेखील रुग्णांना मिळत नसल्याची रुग्णांची व्यथा आहे. याबाबत प्रशासनाने वरिष्ठ आरोग्य विभागाकडे पाठपुरावा केला आहे. तरीही संबंधित विभाग लक्ष घालत नसल्याचा आरोप आहे.
या उपजिल्हा रुग्णालयात सफाई कामगरांअभावी स्वच्छता देखील होत नसल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. आमदार राजेश पाडवी यांनी अचानक रुग्णालयास भेट दिली. त्या वेळी त्यांनी तेथील रुग्णांशी संवाद साधला. उपचाराबाबत रुग्णांना विचारले असता वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून पुरेशा उपचार मिळत असला तरी आजाराशी असलेल्या इतर तपासण्यांची येथे व्यवस्था नसल्याने बाहेरून महागडा खर्च करून आणावे लागत आहे. याशिवाय रुग्णालयात पाण्याची गंभीर समस्या आहे. त्यावर तातडीने उपाय योजना करण्याची मागणी रुग्णांनी केली आहे.
सफाई कर्मचाऱ्यांअभावी साफ सफाई होत नसल्याच्या तक्रारी रुग्णांनी केल्या. दरम्यान आमदार पाडवी यांनी रुग्णालयातील तांत्रिक सुविधांबाबत प्रशासनाकडून माहिती घेतली. पाण्याच्या सुविधेबाबत कुपनलिकेचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, अद्याप पावेतो कार्यवाही झाली नसल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. तरीही या प्रस्तावाबाबत चौकशी करावी नाही तर पुन्हा प्रस्ताव तयार करावा व इतर सुविधांप्रकरणी वरिष्ठ पातळीवर कार्यवाही करण्यासाठी तातडीने पत्र पाठविण्याची सूचना प्रशासनास केली. त्यांच्यासोबत स्वीय सहाय्यक वीरसिंग पाडवी, प्रा.विलास डामरे, विठ्ठल बागले, नीलेश वळवी, किरण सूर्यवंशी उपस्थित होते.

Web Title: Address the issues before the MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.