साक्षीदारच ठरला आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:03 PM2019-11-21T12:03:06+5:302019-11-21T12:03:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : एखाद्या हिंदी चित्रपटाला शोभेल असे कथानक बामखेडा येथील महिलेच्या खुनाच्या गुन्ह्यात उलगडत आहे. आता ...

The accused was the witness | साक्षीदारच ठरला आरोपी

साक्षीदारच ठरला आरोपी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : एखाद्या हिंदी चित्रपटाला शोभेल असे कथानक बामखेडा येथील महिलेच्या खुनाच्या गुन्ह्यात उलगडत आहे. आता ज्याने साक्ष दिली होती तोच संशयाच्या भोव:यात अडकला आहे. त्याच्या साक्षीवरूनच खून झालेल्या महिलेच्या पतीला आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी पुन्हा तपासाची चक्रे फिरविली असता साक्षीदारानेच महिलेचा खून केल्याचे समोर आले आहे. छोटू आधार काकडे, रा.बामखेडा असे संशयीताचे नाव आहे.
11 नोव्हेंबर रोजी बामखेडा शिवारातील शेतात कलाबाई दयाराम गवळे (50) या महिलेचा मृतदेह आढळून आला होता. यासंदर्भात महिलेच्या कुटूंबाने घातपाताचा संशय घेतल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु पोलिसांना काहीही धागेदोर सापडत नव्हते. अखेर गावातीलच गुराखी असलेल्या छोटू काकडे याने पोलीस पाटलांकडे जावून महिलेचा खून अंधश्रद्धेतून तिचा पती दयाराम गवळे आणि दाजी बिजू ठाकरे यांनी केल्याचे सांगितले होते. महिला ताईत बांधण्यास नकार देत असल्याने महिलेच्या पतीने ताईतनेच गळा आवळल्याचे त्याने सांगितले. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी दोघांना अटक करून पाच दिवस पोलीस कोठडी दिली होती. परंतु तपासात धागेदोरे जुळत नसल्याने सारंगखेडा पोलीस ठाण्याचे निरिक्षक चंद्रकांत सरोदे यांनी दुस:या दिशेने तपास सुरु ठेवला. 
छोटू काकडे हा पुन्हा पुन्हा पोलीस ठाण्यात येवून संशयीतांबाबत विचारणा करीत होता. त्यामुळे संशयाची सुई त्याच्याकडे वळविण्यात आले. घटनेच्या दिवशी काकडे कुठे होता. कसा शेतात गेला, कधी परत आला वगैरे माहिती काढल्यानंतर त्याला संशयावरून ताब्यात घेतले. पोलिसांच्या प्रश्नांच्या सरबत्तीपुढे त्याने अखेर नांगी टाकली. आपणच कलाबाई यांचा हाताने गळा आवळून खून केल्याचे सांगितले. 
घटनेच्या दिवशी कलाबाई शेतात काम करीत असतांना बाजरीच्या कणसाचे ओङो डोक्यावर चढवून देण्याच्या बहाण्याने त्यांना अडोश्याला कपाशीच्या शेतात आणले. तेथे त्यांचा गळा दाबून खून केल्याचे त्याने सांगितल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. खून कशामुळे केला याचा उलगडा होणे बाकी आहे. कलाबाई यांच्याकडे पैसे होते ते घेण्यासाठीच त्याने खुन केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असला तरी काही गैरकृत्य करण्याचा तर त्याचा इरादा नव्हता याकडेही पोलिसांनी चौकशीचा रोख सुरू ठेवला आहे. काकडे यास अटक करण्यात आली असून पाच दिवस पोलीस कोठडी देण्यात आली      आहे.
घटनेचा तपास पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक पुंडलीक सपकाळे, स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी केला.     


पोलिसांनी अटक केलेला संशयीत आरोपी छोटू काकडे हा खून झालेल्या कलाबाई गवळे या महिलेच्या शेजारीच राहतो. त्यामुळे त्याने आपल्यावर संशय जावू नये यासाठी पुरेपूर काळजी घेतली होती. खूनाच्या घटनेत त्याचा काही वाईट हेतू होता का?, किती दिवसापासून तो हा गुन्हा करण्यासाठी टपून बसला होता? केवळ पैशांसाठीच त्याने खून केला का? असे एक ना अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. या सर्व प्रश्नांची तड लावण्याचे पोलिसांपुढे आव्हान कायम आहे. 


 

Web Title: The accused was the witness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.