सूचना फलकांअभावी होतेय अपघाती स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST2021-06-17T04:21:20+5:302021-06-17T04:21:20+5:30
सूचना फलकांअभावी होतेय अपघाती स्थिती नंदुरबार : कोळदे ते खेतियाच्या दरम्यान सेंधवा ते विसरवाडी मार्गाचे काम सुरू आहे. यात ...

सूचना फलकांअभावी होतेय अपघाती स्थिती
सूचना फलकांअभावी होतेय अपघाती स्थिती
नंदुरबार : कोळदे ते खेतियाच्या दरम्यान सेंधवा ते विसरवाडी मार्गाचे काम सुरू आहे. यात प्रकाशा ते कोरीटच्या दरम्यान रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी कोरीट गावाजवळ सूचनाफलक नसल्याने वाहन चालकांची भंबेरी उडत आहे. एका बाजूने रस्ता तयार होत असल्याने, वळणरस्ता नेमका दिसत नसल्याने चालकांची त्रेधा उडून अपघाती स्थिती निर्माण होत आहे.
तळोदा तालुक्यात रस्त्यांची दुरुस्ती करावी
बोरद : तळोदा तालुक्यात लोकप्रतिनिधींच्या निधीतून रस्ते निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे. एकीकडे नवीन रस्ते तयार होत असताना, जुन्या रस्त्यांच्या दुरुस्त्यांकडे मात्र बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. बोरद परिसर, प्रतापपूर परिसर, तऱ्हावद परिसरात रस्ते दुरुस्तीची गरज आहे. तालुक्यातील मोठ्या गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या साईडपट्ट्याच नसल्याने किरकोळ अपघात वाढले आहेत.
पावसाळ्यापूर्वी गटार दुरुस्तीची मागणी
नंदुरबार : तालुक्यातील काकर्दे व शिंदगव्हाण परिसरात पावसाळ्यापूर्वी गटरी दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे. गावातील गटारी दुरुस्ती होत नसल्याने सांडपाणी रस्त्यांवर वाहत असल्याचे चित्र आहे. यातून रोगराई पसरण्याचा धोका उद्भवणार आहे.
स्वच्छतागृहांसाठी निधी द्यावा
बोरद : तळोदा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेने सार्वजनिक स्वच्छतागृहे निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आहे. तालुक्यात १४व्या वित्त आयोगातून निर्माण झालेले स्वच्छतागृह हे मोडकळीस आले असल्याचे सांगण्यात आले आहे.
बाजारांमधील वाढत्या गर्दीमुळे चिंता
धडगाव : अनलाॅकनंतर धडगाव येथील आठवडे बाजार नियमित सुरू झाला आहे, परंतु या बाजारात होणारी तोबा गर्दी धोकेदायक असल्याने, प्रशासनाने जनजागृतीवर भर देण्याची गरज आहे. तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांमध्ये गेल्या काही दिवसांत मास्कचा वापर वाढला आहे. या वापरामुळे संसर्गाचा धोका कमी असला, तरीही फिजिकल डिस्टन्सिंग होत नसल्याने धोका कायम असल्याचे बोलले जात आहे.
गावांतर्गत रस्ते निर्मितीकडे दुर्लक्ष
शहादा : तालुक्यातील अनेक गावांमध्ये गावांतर्गत रस्ते निर्मिती गेल्या दोन वर्षांत रखडली आहे. यातून गावाेगावी गावांतर्गत रस्तेच नसल्याचे दिसून आले आहे. रस्ते नसल्याने स्थानिक ग्रामस्थांचे हाल होत असून, संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
ग्रामस्तरावरील कर्मचारी झाले हजर
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट भीषण ठरली होती. यातून ग्राम स्तरावरील ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी व मंडळ अधिकारी हे कर्मचारी तालुका स्तरावर कोविड नियुक्त होते, परंतु हे कर्मचारी आता कामावर परतले असून, त्यांच्याकडून कामकाज गतिमान केले जात आहे.
शासकीय कार्यालयात वाढू लागली वर्दळ
तळोदा : कोरोनामुळे शहरातील प्रशासकीय संकुलातील कार्यालयांत निवडक कर्मचारी दिसून येत होते. यातून वैयक्तिक लाभ योजनांचे लाभार्थी, तसेच इतर नागरिक येथे भेट देणे टाळत होते, परंतु कामकाज सुरू झाल्यानंतर या कार्यालयांमध्ये वर्दळ वाढली आहे.
ग्रामीण भागात बसेस सुरू करण्याची मागणी
नंदुरबार : जिल्ह्यातील चारही आगारांनी ग्रामीण भागातील मुक्कामी बसेस सुरू करण्याची मागणी होत आहे. या बसेसमुळे प्रवाशांना ग्रामीण भागातून शहरी भागात येणे सोपे होणार आहे. खासगी वाहनात प्रवास त्रासदायक असल्याने ही मागणी आहे.