मजुरांच्या वाहनाला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 12:48 IST2020-09-13T12:48:03+5:302020-09-13T12:48:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : विसरवाडी-नंदुरबार मार्गावर मोठ्या कडवान गावाच्या फाट्याजवळ नवापूर कडून पाचोराबारी कडे मजूर घेऊन जाणारे पिक ...

मजुरांच्या वाहनाला अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : विसरवाडी-नंदुरबार मार्गावर मोठ्या कडवान गावाच्या फाट्याजवळ नवापूर कडून पाचोराबारी कडे मजूर घेऊन जाणारे पिक अप वाहन उलटल्याने झालेल्या अपघातात १८ मजूर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात शनिवारी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला.
पोलीस सूत्रांनुसार, नवापुर तालुक्यातील पाचोराबारी ता. नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावर कामासाठी मजूर घेऊन जाणारे पिकप वाहन (क्रमांक एमएच ४१ जी-१०७१) हे विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील मोठे कडवान गावाच्या फाट्याजवळून जात असताना पुढे चालणाऱ्या दुचाकी चालकाने अचानक ब्रेक लावून वळविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पिकअप चालकाने त्याला वाचविण्यासाठी अचानक ब्रेक लावला असता वाहनावरील नियंत्रण सुटून ते लहान पुलाचे कठडे तोडून रस्त्याच्या बाजूला उलटले.
मजुरांना पुढील उपचारासाठी गुजरात राज्यातील व्यारा येथे व काही रुग्णांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, अनिल राठोड, देवेंद्र हिरे, अतुल पानपाटील आदी घटनास्थळ दाखल झाले.
या अपघातात गजू मधुकर गावित, रा. चिंचपाडा, पानुबाई फत्तु वसावे, विजूबेन हिरालाल वळवी, चंद्रवती संजू वसावे, अंजूबेन सोहन भाई वसावा, सर्व राहणार खाबदा, संदीप बाला वसावे, अशोक काशीराम वळवी, आंब्या गोमा वळवी, मनोहर निमजी गावित, किशोर भिमसिंग वसावे, पिनेश रमेश वसावे, अनिल ईमान गावित, विशाल रामजी गावित सर्व राहणार बिलबारा ता. नवापूर, सोमुवेल रोजी गावित रा.आमपाडा, दिनेश चुनीलाल गावित, जामतलाव, राजकुमार कर्मा गावित, रायंगण ता नवापूर असे जखमींची नावे आहेत. याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात येत आहे.
या अपघातात पिकअप मधील १८ मजूर जखमी झाले. पैकी पाच मजुरांची प्रकृती चिंताजनक आहे. मजुरांना हातापायास व डोक्यास मार लागला आहे. यावेळी विसरवाडी येथील वाहन चालक राजेंद्र मिस्त्री हे नंदुरबार कडे जात असताना त्यांच्या निदर्शनास हा अपघात आल्याने त्यांनी स्वत:च्या वाहनाने तसेच १०८ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने अपघातातील जखमींना विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमी रुग्णांवर वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद वळवी, परिचारिका प्रसन्ना वळवी तसेच कर्मचारी यांनी उपचार केले.