प्रेयसीने लग्न करण्यास नकार दिल्याने युवकाचा गळफास, प्रेयसीसह दोघांवर गुन्हा
By मनोज शेलार | Updated: March 2, 2023 19:34 IST2023-03-02T19:34:29+5:302023-03-02T19:34:39+5:30
प्रेयसीने लग्न करण्यास नकार देत प्रेम संबंध तोडल्यामुळे विरह सहन न झाल्याने शहाद्यातील जोशीपुरा येथील एका २२ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवार, १ मार्च रोजी घडली.

प्रेयसीने लग्न करण्यास नकार दिल्याने युवकाचा गळफास, प्रेयसीसह दोघांवर गुन्हा
नंदुरबार : प्रेयसीने लग्न करण्यास नकार देत प्रेम संबंध तोडल्यामुळे विरह सहन न झाल्याने शहाद्यातील जोशीपुरा येथील एका २२ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवार, १ मार्च रोजी घडली. याप्रकरणी २ मार्च रोजी शहादा पोलिसात प्रेयसी व तिचा मित्र या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, शहरातील जोशीपुरा भागात राहणाऱ्या सय्यद वैस सय्यद इरफान (२२) या युवकाने एक मार्चला दुपारी चार वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाइड नोट लिहून ठेवली होती. घरच्या लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर प्रभारी पोलिस निरीक्षक राजन मोरे व पथकाने घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता, त्यांना एक सुसाइड नोट आढळून आली. आत्महत्या ही प्रेमसंबंध तुटल्यामुळे झाली असल्याचे समोर आले.
सुसाइड नोटवरून पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. गुरुवारी सकाळी पोलिस स्टेशनला संबंधित युवती व सागर संजय जव्हेरी (२४) या दोघांसह काही साक्षीदारांना पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आले. चौकशीअंती पोलिसांनी दोघांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश पवार करीत आहेत. गुरुवारी दुपारी शोकाकुल वातावरणात सय्यद वैस याच्या पार्थिवावर कब्रस्तान येथे अंतिम संस्कार करण्यात आले.