Nandurbar : होळीला माहेरी आलेल्या मातेचे दोन महिन्यांचे बाळ उलट्या आणि अति रडण्याने निपचित पडले. घरच्या लोकांना बाळाचा मृत्यू झाल्याचे वाटल्याने महिलेच्या माहेरी आणि सासरी रडारड सुरू झाली. अशातच जवळच असलेल्या आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना माहिती मिळाली. त्यांनी रुग्णवाहिका पाठविली. स्वतःही जात वाटेतच रुग्णवाहिका थांबवून बाळाची तपासणी केली. हलकीच पायाला टिचकी मारली आणि बाळाने श्वासोच्छास घेण्यास सुरुवात केली. ही घटना नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेलखेडी येथील मीनाबाई सचिन पावरा या होळीनिमित्त आपल्या दोन महिन्यांच्या बाळाला घेऊन माहेरी सूर्यपूर येथे गेल्या होत्या. माहेरी गेल्यावर बाळाची तब्येत बिघडली. उलट्या होऊन बेजार झालेले बाळ दूधही पीत नव्हते रडता रडता आवाज बसला आणि बाळ निपचित पडले. श्वासोच्छ्रुासही बंद पडला. बाळ मृत झाल्याचा समज करून सासरी तेलखेडी येथे निरोप पाठविण्यात आला. तेलखेडी व सूर्यपूर येथे रडारड सुरू झाली. अशातच तेलखेडीचे आरोग्य अधिकारी डॉ. गणेश तडवी यांना झालेला प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी रुग्णवाहिका पाठवली. स्वतःही तिकडे निघाले. महिलेच्या माहेरची मंडळी दवाखान्यात येण्यासाठी नाही म्हणत होते. गावी तेलखेडीला पोहोचून द्या म्हणून सांगू लागली.
पायाला टिचकी मारली अन् बाळाने घेतला श्वास...जेमतेम रुग्णवाहिकेत बसविल्यानंतर वाटेतच डॉ. तडवी यांची भेट झाली. त्यांनी बाळाला तपासले. हृदयाची गती मंद होती, हातपाय पूर्ण थंडगार पडलेले होते, श्वास बंद होता. डॉ. तडवी यांनी आपल्या अनुभवातून बाळाच्या तळपायाला जोरात टिचकी मारली. लागलीच बाळाने एक मोठा श्वास घेतला. त्यानंतर हळूहळू श्वास घेण्यास सुरुवात केली. बाळाला धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सलाईन लावल्यानंतर बाळ नियमित श्वास घ्यायला लागले. सकाळी बाळाची शुगर चेक करून जिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगितले. परंतु नातेवाईकांनी शहाद्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. आता बाळाची प्रकृती ठणठणीत असून, दोन दिवसांनी त्याला डिस्चार्ज दिला जाणार आहे. डॉ. गणेश तडवी यांच्या रुपाने देवदूतच भेटल्याची प्रतिक्रिया नातेवाईकांनी दिली. परिसरात चर्चेचा विषय...बाळाला मिळालेल्या जीवदानाचा विषय परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. ज्याच्या आयुष्याची दोरी बळकट असते त्याला कुठल्याही माध्यमातून जीवदान मिळू शकते. दोन महिन्याच्या बाळाची आयुष्याची दोरी देखील बळकट असल्याने त्याला या माध्यमातून जीवदान मिळाले.