पहाटे उघड्या घरात शिरला बिबट्या; झोपलेल्या व्यक्तीवर केला हल्ला
By मनोज शेलार | Updated: November 22, 2023 19:03 IST2023-11-22T19:03:20+5:302023-11-22T19:03:48+5:30
अक्कलकुवा तालुक्यातील गुलीआंबा - खाडीपाडा येथील सुरुपसिंग गोण्या वळवी यांच्या घरात पहाटे अडीच वाजेच्या सुमारास बिबट्या घरात घुसला

पहाटे उघड्या घरात शिरला बिबट्या; झोपलेल्या व्यक्तीवर केला हल्ला
नंदुरबार : सातपुड्यातील दुर्गम भागातील गुलीआंबा - खाडीपाडा येथे उघड्या घरात घुसून बिबट्याने एकावर हल्ला केल्याने जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील गुलीआंबा - खाडीपाडा येथील सुरुपसिंग गोण्या वळवी यांच्या घरात पहाटे अडीच वाजेच्या सुमारास बिबट्या घरात घुसला. खाटेवर झोपलेल्या सुरुपसिंग यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याच्या अचानक हल्ल्याने व झोपेत असल्याने त्यांना प्रतिकार करता आला नाही. त्यांना ओढून बाहेर नेण्याचा प्रयत्न बिबट्याने केला. परंतु, त्यांनी जिवाच्या आकांताने आरडाओरड केल्यानंतर बिबट्या तेथून पसार झाला. यात सुरुपसिंग हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या हाताला, पायाला जखमा झाल्या आहेत. पहाटेच त्यांना झोळी करून वाहनाची सोय असलेल्या जागेपर्यंत आणून तेथून वाहनाने ग्रामस्थांनी अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
प्राथमिक उपचारानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वन विभागाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.