नंदुरबार : भडगाव, ता. शहादा शिवारात अंगावर वीज पडून देऊर येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना १८ रोजी घडली. याबाबत सारंगखेडा पोलिसात नोंद करण्यात आली आहे. देऊर तालुका शहादा येथील शेतकरी उज्जनसिंग आनंदसिंग गिरासे (४०) हे त्यांच्या भडगाव शिवारातील शेतात निंबाच्या झाडाखाली बसून होते.
त्याच्यावेळी अचानक विजांचा कडकडाटासह पाऊस व वादळ आले. यात त्यांच्या अंगावर नैसर्गिक वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी वडाळी मंडळ अधिकारी आणि भडगाव तलाठी नीतेश मोरे यांनी भेट दिली. मयत उज्जनसिंग यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील, तीन भाऊ, भवजाई, पुतणे असा परिवार आहे. सारंगखेडा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.